मिश्र दुहेरीत सानिया-डोडिग जोडीला उपविजेतेपद
By admin | Published: January 30, 2017 03:31 AM2017-01-30T03:31:21+5:302017-01-30T03:31:21+5:30
सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली आहे.
सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली आहे. सानिया आणि तिचा क्रोएशियन सहकारी इवान डोडिग या द्वितीय मानांकित जोडीला आॅस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या एबिगेल स्पियर्स व कोलंबियाच्या युआन सबेस्टियन कबाल या बिगरमानांकित जोडीने त्यांचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-४ असा पराभव केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पियर्स आणि कबाल जोडीने आक्रमक खेळ केला आणि सानिया-डोडिग जोडीला लय मिळविणं कठीण गेलं. केवळ २६ मिनिटांत सानिया-डोडिग जोडीने पहिला सेट ६-२ असा गमाविला. दुसऱ्या सेटमध्ये दोघांनी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला; मात्र स्पियर्स आणि कबाल जोडीने वर्चस्व गाजवत ६-४ असा दुसरा सेट जिंकला आणि आॅस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकाविलं. सानियाने पाचव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. २००८ मध्ये महेश भूपतीच्या साथीने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर त्यानंतरच्या वर्षी या जोडीने जेतेपद पटकाविले होते.
२०१४ मध्ये होरिया तेकाऊच्या साथीने सानिया उपविजेती ठरली होती. यंदाही सानियाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं आहे. सानियाने तीन मिश्र ग्रँडस्लॅम जिंकले असून, ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससोबत अमेरिकन ओपनचे २०१४ मध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपदही पटकाविले आहे. मागच्या वर्षी सानियाला डोडिगसोबत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकाविण्याची संधी होती; पण या जोडीला फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत लियांडर पेस-मार्टिनाहिंगीसकडून पराभवाचा धक्का बसला होता.