भारत-पाक क्रिकेटसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा : अक्रम

By admin | Published: October 1, 2015 10:43 PM2015-10-01T22:43:12+5:302015-10-01T22:43:12+5:30

भारत-पाक क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने केला आहे.

Modi should take initiative for Indo-Pak cricket: Akram | भारत-पाक क्रिकेटसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा : अक्रम

भारत-पाक क्रिकेटसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा : अक्रम

Next

कराची : भारत-पाक क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने केला आहे.
डावखुरा माजी वेगवान गोलंदाज वसीम म्हणाला, ‘भारत-पाक सामने नेहमी रोमहर्षक आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे होतात. उभय देशात क्रिकेट होत नसल्याने खेळाचे मोठे नुकसान झाले. भारत या संदर्भात सकारात्मक पावले उचलेल, अशी मला आशा आहे. मी मोदी यांना संयुक्त अरब अमिरातमध्ये भेटीदरम्यान भारत-पाक क्रिकेट सुरू करण्याचा आग्रह केला होता. त्यांनी या संदर्भात कॅबिनेटशी चर्चादेखील केली. भारताला महाशक्ती बनविण्याचा विचार मोदी यांच्या डोक्यात आहे. क्रिकेटमध्ये भारत आधीच महाशक्ती असल्याने क्रिकेटला चालना देण्याची भूमिका भारताने घ्यायला हवी.’
१९९९ च्या भारत दौऱ्याला उजाळा देताना अक्रम म्हणाला, ‘धोक्याची घंटा मिळाल्यानंतरही आम्ही त्या वेळी भारत दौरा केला. चांगली कामगिरी करीत दोन सामने जिंकून तीन कसोटी सामन्यांची मालिका खिशात घातली होती. भारतीय क्रीडाप्रेमींनी केलेल्या जल्लोशपूर्ण स्वागताने आम्ही भारावून गेलो होतो.’
भारताने २००४ साली पाकचा दौरा केला, त्या वेळी पाकमधील चाहत्यांनी तसेच स्वागत केले. भारत- पाक क्रिकेटला धर्म मानणारे देश आहेत. मैदानावर दोन्ही संघांदरम्यान धर्मयुद्ध खेळले जाते. उभय संघांनी खेळाव्यतिरिक्त इतर सर्व बाबींना तिलांजली देत रोमहर्षक क्रिकेट खेळायला सुरुवात करावी, असा माझा आग्रह राहील.’ भारत-पाकमध्ये २००७ पासून मालिकेचे आयोजन झाले नाही. भारत सरकार या दिशेने पुढाकार घेईल, अशी पीसीबीला आशा आहे. डिसेंबरमध्ये उभय संघ अबुधाबी येथे खेळण्यास सज्ज असतील, असे अक्रमला वाटते. (वृत्तसंस्था)

Web Title: Modi should take initiative for Indo-Pak cricket: Akram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.