मोहम्मद आमिरचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:37 AM2018-12-03T03:37:17+5:302018-12-03T03:37:29+5:30
अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राचा शरीरसौष्ठवपटू मोहम्मद आमिर याला राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकापासून थोडक्यात मुकावे लागले.
- रोहित नाईक
विशाखापट्टणम : अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राचा शरीरसौष्ठवपटू मोहम्मद आमिर याला राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकापासून थोडक्यात मुकावे लागले. उत्कृष्ट सादरीकरण आणि शानदार शरीरयष्टीच्या जोरावर यजमान आंध्र प्रदेशच्या के. श्रीनिवास याने आमिरला मागे टाकले.
इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या (आयबीबीएफ) प्रथमच विशाखापट्टणम येथील गुरजाडा कलाक्षेत्रम येथे सुरू असलेल्या हिल्स, वॅलीस आणि माऊंटन्स (एचव्हीएम) या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या मोहम्मद आमिरने ६० किलो वजनी गटात सर्वांचे लक्ष वेधले. मात्र सुवर्णपदक पटकावण्यापासून तो थोडक्यात अपयशी ठरला. प्राथमिक फेरीमध्ये २७ सहभागी खेळाडूंमधून वर्चस्व राखत दिमाखात अंतिम फेरी गाठलेल्या आमिरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मोक्याच्यावेळी शानदार सादरीकरण केलेल्या श्रीनिवास याने काही गुणांच्या जोरावर बाजी मारत सुवर्णपदकावर स्वत:चे नाव कोरले. श्रीनिवासच्या धडाक्यापुढे अखेर आमिरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी, आंध्र प्रदेशच्याच एस. के. रेहमान याने कांस्यपदकावर कब्जा केला. तसेच सोहम सरकार आणि सुनंदन बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या खेळाडूंना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.
याआधी झालेल्या ५५ किलो वजनी गटातूनही महाराष्ट्र व विदर्भाच्या शरीरसौष्ठवपटूंनी छाप पाडताना लक्षवेधी कामगिरी केली.
पुरुषांच्या ८ वजनी गटामध्ये आणि महिलांच्या गटामध्ये होत असलेल्या या स्पर्धेत प्रामुख्याने आदिवासी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेतील पुरुष व महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे ‘एचव्हीएम मिस्टर इंडिया’ व ‘एचव्हीएम मिस इंडिया’ किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी २५० खेळाडूंपैकी ७० खेळाडू आदिवासी समाजाचे आहेत.