मोहम्मद शमीची चमकदार कामगिरी
By admin | Published: June 20, 2016 08:16 PM2016-06-20T20:16:42+5:302016-06-20T20:16:42+5:30
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मोहन बागान व भवनीपूर यांच्यादरम्यान प्रथमच गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक सीएबी सुपर लीग फायनलमध्ये रविवारी
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २० - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मोहन बागान व भवनीपूर यांच्यादरम्यान प्रथमच गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक सीएबी सुपर लीग फायनलमध्ये रविवारी चमकदार कामगिरी करताना ४२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. गुलाबी चेंडूने पाच बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या ऐतिहासिक लढतीत शमीने गुलाबी चेंडूने शानदार छाप सोडली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सुरू झालेल्या या नव्या प्रयोगाचा शानदार अनुभव घेतला. शमीने स्विंगच्या जोरावर गुलाबी चेंडू भारतात उपयुक्त सिद्ध होईल, याची प्रचिती दिली.
जवळजवळ पाच हजारांपेक्षा अधिक पे्रक्षकांच्या उपस्थितीत शमीने त्याचा संघ मोहन बागानतर्फे १३.४ षटकांत ४२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. शमीच्या गोलंदाजीपुढे भवानीपूरच्या फलंदाजांनी गुडघे टेकवले.
गुलाबी चेंडूबाबत बोलताना शमी म्हणाला, ‘गुलाबी चेंडू चमकदार आहे. लाल व पांढरा चेंडू दिसण्यासाठी थोडी अडचण भासते. कारण काही कालावधीनंतर चेंडूला हिरवळीचा रंग येतो. मला गुलाबी चेंडूने गोलंदाजी करणे नक्कीच आवडेल. दुपारच्या सत्रात वातावरणात आर्द्रता असल्यामुळे मदत मिळाली. फ्लड लाईटमध्ये चेंडू अधिक स्विंग होत होता. त्या वेळी फलंदाज व गोलंदाजासाठी आव्हान होते.’
काही गोलंदाजांच्या मते गुलाबी चेंडू अधिक स्विंग होत नाही. याबाबत बोलताना शमी म्हणाला, ‘गोलंदाजाला स्विंगबाबत माहिती असेल तर तो नक्कीच चेंडू स्विंग करू शकतो. गुलाबी चेंडू आपली छाप सोडत आहे. चेंडूतील कोरडेपणा कायम राखला तर नक्कीच रिव्हर्स स्विंग होईल.’
शमीचा संघसहकारी मोहन बागानचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा म्हणाला, गुलाबी चेंडू सातत्याने स्विंग होत होता. लाल कुकाबुराने गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडू स्विंग होत नाही, पण गुलाबी चेंडू मात्र प्रत्येक वेळी स्विंग होत होता. लाल व पांढरा चेंडू जुना झाल्यानंतर त्याच्यावर हिरवळीचा रंग चढतो; पण गुलाबी चेंडूमध्ये मात्र ही अडचण भासत नाही.’