मोहालीत विराट तळपला

By admin | Published: October 24, 2016 04:29 AM2016-10-24T04:29:02+5:302016-10-24T04:29:02+5:30

भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात रविवारी न्यूझीलंडचा ७ गडी राखून धुव्वा उडवताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

Mohat Virat Talpala | मोहालीत विराट तळपला

मोहालीत विराट तळपला

Next

मोहाली : विराट कोहलीने आणखी एक अफलातून केलेली नाबाद १५४ धावांची खेळी आणि त्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनी (८०) याच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १५१ धावांच्या लाजवाब भागीदारीच्या बळावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात रविवारी न्यूझीलंडचा ७ गडी राखून धुव्वा उडवताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
भारतासमोर न्यूझीलंडने ४९.४ षटकांत २८५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती; परंतु विराटने मोहालीतील मैदानावर विक्रमी खेळी करताना कठीण लक्ष्य सोपे केले. वन-डे कारकिर्दीतील २६ वे शतक ठोकणाऱ्या विराटने धोनीसोबत २७.१ षटकांत १५१ धावांची जबरदस्त भागीदारी केली. या बळावर भारताने ४८.२ षटकांत ३ बाद २८९ धावा करीत सामना जिंकला.
टीम इंडियाचे रन मशीन विराटने १३४ चेंडूंत १६ चौकार व एका षटकारासह नाबाद १५४ धावांची विजयी खेळी केली. या खेळीमुळे विराट सामनावीर ठरला. विशेष म्हणजे वैयक्तिक (६) धावसंख्येवर विराट कोहलीला रॉस टेलरने जीवदान दिले होते. हे जीवदान न्यूझीलंडला खूपच महागात पडले. विराटचे हे २६ वे शतक होते अणि त्याने श्रीलंकेचा कुमार संगकाराला मागे टाकले आणि तो वनडे-त सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला.
विराटने मोहाली मैदानावर कर्णधार धोनीची सर्वोत्तम १३९ धावांची विक्रमी खेळीही मागे टाकली. अजिंक्य रहाणे (५) आणि रोहित शर्मा (१३) हे धावफलकावर ४१ धावा असताना तंबूत परतल्यानंतर धोनीने स्वत:ला बढती देताना ९१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ८० धावांची सुरेख खेळी केली. धोनीने एका वर्षानंतर अर्धशतक ठोकले. धोनीचे हे ६१ वे अर्धशतक होते. विराट आणि धोनी यांनी आधी धीरोदात्त खेळी केली आणि नंतर आपली नैसर्गिक फटकेबाजी केली. या दोघांत तिसऱ्या गड्यासाठी २७.१ षटकांत १५१ धावांची विजयी भागीदारी झाली. विराटने त्याच्या ५० धावा ४९ चेंडूंत, १०० धावा १०४ चेंडूंत आणि १५० धावा १३३ चेंडूंत पूर्ण केल्या.
धोनीने त्याचे अर्धशतक ५९ चेंडूंत पूर्ण केले. धोनीने या सामन्यात तीन विक्रम केले. तो तिन्ही फॉर्मेटमध्ये १५० फलंदाजांना यष्टिचित करणारा जगातील पहिला यष्टिरक्षक बनला, तसेच त्याने वन-डेत ९००० धावाही पूर्ण केल्या आणि आपल्या डावात तीन षटकारांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक षटकारांचा भारतीय विक्रमही मोडला.
धोनी मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर टेलरकरवी झेलबाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या १९२ होती. त्यानंतर विराटने मनीष पांडे (नाबाद २८) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १२.३ षटकांत ९७ धावांची नाबाद भागीदारी करताना भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले. पांडेने हेन्रीला विजयी चौकार मारला.
त्याआधी ४८ व्या षटकात विराटने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या एकाच षटकात ३ चौकार आणि एक षटकार ठोकताना एकूण २२ धावा वसूल केल्या आणि सामना दहा चेंडू असतानाच ४८.२ षटकांत समाप्त झाला. त्याचबरोबर भारताने दिल्लीच्या पराभवाचा हिशेबही चुकता केला.

धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल पायचित गो. यादव २७, टॉम लॅथम झे.
पांड्या गो. जाधव ६१, केन विल्यम्सन पायचित गो. जाधव २२, रॉस टेलर यष्टिचित धोनी गो. मिश्रा ४४, कोरी अँडरसन झे. रहाणे गो. जाधव ०६,
ल्यूक राँची यष्टिचित धोनी गो. मिश्रा ०१, जेम्स निशाम झे. जाधव गो.
यादव ५७, मिशेल सँटेनर झे. कोहली गो. बुमराह ०७, टीम साऊदी त्रि.
गो. यादव १३, मॅट हेन्री नाबाद ३९, ट्रेंट बोल्ट त्रि. गो. बुमराह ०१. अवांतर :
७. एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद २८५. बाद क्रम : १-४६, २-८०,
३-१५३, ४-१६०, ५-१६१, ६-१६९, ७-१८०, ८-१९९, ९-२८३, १०-२८५.गोलंदाजी : यादव १०-०-७५-३, पांड्या ५-०-३४-०,
बुमराह ९.४-०-५२-२, जाधव ५-०-२९-३, पटेल १०-०-४९-०, मिश्रा १०-०-४६-२.
भारत : रोहित शर्मा पायचित गो. साऊदी १३, अजिंक्य रहाणे झे. सँटेनर गो. हेन्री ५, विराट कोहली नाबाद १५४, महेंद्रसिंह धोनी झे. टेलर गो. हेन्री ८०, मनीष पांडे नाबाद २८, अवांतर : ९, एकूण : ४८.२ षटकांत ३ बाद २८९. गडी बाद क्रम : १-१३ (रहाणे, २.५), २-४१ (शर्मा, ८.४), ३-१९२ (धोनी, ३५.५). गोलंदाजी : हेन्री ९.२-०-५६-२, बोल्ट १०-०-७३-०, साऊदी १०-५-५५-१, सँटेनर १०-०-४३-०, निशाम ९-०-६०-०.

Web Title: Mohat Virat Talpala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.