Australian Open, Victoria Azarenka with Son: माँ तो माँ होती है! मुलाला सोबत घेऊन महिला खेळाडू थेट प्रेस कॉन्फरन्समध्ये आली अन्..., पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:04 PM2022-01-22T15:04:33+5:302022-01-22T15:05:37+5:30
तिचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून तिच्या कृतीबद्दल तिला सर्व स्तरातून शाबासकी दिली जात आहे.
मेलबर्न: ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शुक्रवारी बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका हिने १५ व्या मानांकित युक्रेनच्या इलिना स्विटोलीनाचा ६-०, ६-२ असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. २४ व्या मानांकित अझारेंकाने प्रतिस्पर्धी खेळाडूला फारशी संधीच दिली नाही. विशेष म्हणजे, सामना जिंकल्यानंतर अझारेंका तिचा मुलगा लिओसोबत पत्रकार परिषदेत पोहोचली. पाच वर्षांचा लिओ पत्रकार परिषदेत गॉगल लावून आईच्या मांडीवर ऐटीत बसला आणि त्यानेही पत्रकारांना उत्तरं दिली.
व्हिक्टोरियाने दमदार खेळ करत सामना जिंकला. त्यानंतर तिला पत्रकार परिषदेत हजर राहायचं होतं. त्यासाठी ती पत्रकार परिषदेला आली. पण यावेळी चित्र नेहमीपेक्षा वेगळं होतं. व्हिक्टोरिया थेट आपला मुलगा लिओ याला सोबत घेऊन आली. लिओदेखील अजिबातच लाजला नाही. व्हिक्टोरिया पत्रकारांना उत्तर देण्यासाठी जाऊन खुर्चीत बसताच लिओ देखील पटकन तिच्या मांडीत जाऊन बसला. गोष्ट इथेच थांबली नाही. व्हिक्टोरियाने गॉगल लावला होता, त्यामुळे लिओनेदेखील लगेच झकासपैकी गॉगल लावला आणि तो पत्रकार परिषदेत पूर्ण वेळा आईच्या मांडीवरच बसून राहिला.
व्हिक्टोरियाला प्रश्न विचारण्यापूर्वी चिमुरड्या लिओला त्याच्या आईच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ऑस्ट्रेलियन ओपनमधील तिसऱ्या फेरीत तुझी आई कशी खेळली असा सवाल त्याला पत्रकारांनी केला. त्यावर, Awesome (अतिउत्तम) असं उत्तर छोट्या लिओने दिलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, तिच्या या कृतीबद्दल तिला सर्व स्तरातून शाबासकी दिली जात आहे.
Reporter: "Leo, how did mummy play today?"
— #AusOpen (@AustralianOpen) January 21, 2022
Leo: 😎😎😎@vika7 · #AusOpen · #AO2022 · #AOpressconpic.twitter.com/o1KRswMLio
त्यानंतर व्हिक्टोरियाला मुलाबद्दल विचारण्यात आलं. एखाद्या बड्या स्पर्धेत मुलाला सोबत घेऊन येणं हे लक्ष विचलित करणारे आहे की दिलासा व आनंद देणारे आहे, असा सवाल तिला करण्यात आला. त्याला उत्तर देताना ती म्हणाली, "मी नक्कीच विचलित होत नाही. पालक होणे सोपे नाही. त्यासाठी खूप गोष्टींची तडजोड करावीच लागते. मी माझ्या मुलाला इथे आणू शकले हे यासाठी मी नेहमीच स्वत:ला भाग्यवान समजलं आहे. असे क्षण माझ्यासाठी खरोखरच अमूल्य आहेत. अन् आजचा हा क्षण माझ्या मुलासोबत शेअर करणं माझ्यासाठी अविश्वसनीय आहे."