मोमीनूल, तमीमची अर्धशतके
By admin | Published: January 13, 2017 01:22 AM2017-01-13T01:22:12+5:302017-01-13T01:22:12+5:30
मोमीनूल हक आणि तमीम इक्बाल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगला देशने न्यूझीलंड विरुद्ध
वेलिंग्टन : मोमीनूल हक आणि तमीम इक्बाल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगला देशने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययानंतरही ठोस सुरुवात करीत ३ बाद १५४ अशी वाटचाल केली. दोनदा पावसाने हजेरी लावली. अंधुक सूर्यप्रकाशामुळे केवळ ४०.२ षटकांचाच खेळ होऊ शकला.
मोमीनूल ६४ तसेच साकीब उल हसन ५ धावांवर नाबाद आहेत. साकीबला चार धावांवर जीवदान मिळाले. सलामीवीर तमीमने ५६ धावा ठोकल्या. ढगाळ वातावरण, वेगवान वारे आणि हिरव्यागार मैदानावर बोचऱ्या थंडीत गोलंदाजांसाठी पोषक वातावरण होते. पण बांगला देशच्या फलंदाजांनी हे आव्हान लीलया पेलले. तमीमने ५० चेंडूत ९ चौकारांसह ५६ तर मोमीनूलने ११० चेंडूत १० चौकार व एका षटकारासह ६४ धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून बांगला देशला फलंदाजीची संधी दिली. टिम साऊदीने चौथ्याच षटकात इमरुल कायेस(१)ला ट्रेंट बोल्टकडे झेल देण्यास भाग पाडले.
यानंतर पावसामुळे खेळ थांबला.खेळ सुरू झाला तेव्हा बोल्टने पहिल्याच षटकात तमीमला पायचित केले. न्यूझीलंड विरुद्ध गेल्या चार डावांत दोन शतके ठोकणाऱ्या मोमीनूलला सुरुवातीला पकड निर्माण करता आली नव्हती. लगेच पावसाने पुन्हा हजेरी लावली.
पाऊस थांबताच खेळ सुरू झाला तेव्हा मोमीनूल फटके मारताना दिसला. त्याने मोहमदुल्लाह(२६)याच्यासोबत तिसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भागीदारी केली. नील व्हॅगनरने मोहमदुल्लाहला यष्टिरक्षक बीजे वॉटलिंगकडे झेल देण्यास बाध्य केले. पुढील दोन दिवस हवामान चांगले राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली असून, रविवारी मात्र पाऊस येऊ शकतो.
(वृत्तसंस्था)