झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सोमवारी संघनिवड
By admin | Published: June 27, 2015 12:48 AM2015-06-27T00:48:58+5:302015-06-27T00:48:58+5:30
पुढील महिन्यात आयोजित भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट कायम असल्यामुळे अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मुंबई : पुढील महिन्यात आयोजित भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट कायम असल्यामुळे अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, बीसीसीआयने राष्ट्रीय निवडकर्त्यांना २९ जून रोजी नवी दिल्लीत संघ निवडण्याच्या सूचना दिल्या.
सिनियर खेळाडूंच्या उपलब्धतेची सूचना राष्ट्रीय निवडकर्त्यांना नव्हती. मीडियातील वृत्तानुसार अनेक खेळाडूंनी या दौऱ्यातून सूट मागितल्याचे कळते. मीडियातील वृत्तास दुजोरा मिळावा यासाठी निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील म्हणाले, ‘‘आतापर्यंत तरी कुठल्याही खेळाडूंनी सूट मागण्याविषयी संपर्क साधलेला नाही.’’ संघनिवडीसाठी सोमवारी नवी दिल्लीत बैठक होणार असल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. गेल्या वर्षभरात सातत्याने क्रिकेट खेळून वरिष्ठ खेळाडू थकले आहेत. त्यांना विश्रांती हवी असल्याने त्यांची जागा ब दर्जाच्या संघातील खेळाडू घेतील, असे मानले जाते. एखाद्या खेळाडूला दौरा करायचा नसेल, तर तो खेळाडू बीसीसीआय सचिवांना कळवितो. सचिव ही माहिती पाच सदस्यांच्या समितीकडे पाठवितात. ठाकूर हे सध्या आयसीसीच्या बैठकीसाठी बार्बाडोसला गेले आहेत. त्यांच्याकडे एखाद्या खेळाडूने सूट मागितली काय, याची माहिती मिळू शकली नाही.
प्रसारण हक्क मुद्द्यामुळे आधीच हा दौरा अडचणीत आला. झी नेटवर्क समूहाच्या अधिकारात असलेल्या टेन स्पोर्ट्सवर प्रसारण करण्यास बीसीसीआय तयार नाही. झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या अधिकारात होणाऱ्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांंचे प्रसारण करण्याचा अधिकार झी नेटवर्ककडे आहेत. दुसरीकडे, असेही वृत्त आहे, की हा दौरा पुढील दोन वर्षांसाठी स्थगित केला जाऊ शकतो. पण, बीसीसीआय किंवा आयसीसी बोर्डाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.