CoronaVirus News: पैसा आणि वेळ व्यर्थ गेला- दूती चंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 03:21 AM2020-05-01T03:21:00+5:302020-05-01T06:42:13+5:30
अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली.
नवी दिल्ली : ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिकच्या तयारीवर जो खर्च झाला तो पैसा आणि वेळ व्यर्थ गेला. ऑलिम्पिकचे आयोजनदेखील अधांतरी आहे. अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली.
कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन असल्याने क्रीडाविश्व ठप्प झाले आहे. ओडिशाच्या या धावपटूने आॅलिम्पिकच्या तयारीसाठी विदेशात प्रशिक्षण तसेच कोचेसच्या मार्गदर्शनावर आतापर्यंत ३० लाख रुपये खर्च केले. भुवनेश्वर येथून वृत्तसंस्थेशी बोलताना दूती म्हणाली, ‘गेल्या आॅक्टोबरपासून कोच, सहायक कोच, ट्रेनर, रनिंग पार्टनर अशा दहा जणांच्या चमूसोबत माझा सराव सुरू झाला होता. यावर महिन्याकाठी साडेचार लाख खर्च यायचा. आतापर्यंत ३० लाखाचा खर्च होऊन गेला.’
जकार्ता येथे २०१८ ला झालेल्या आशियाई स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीची रौप्य विजेती दूती क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट आॅलिम्पिक योजनेत सहभागी नाही. ओडिशा सरकार आणि केआयआयटीने तिला दत्तक घेतले आहे. टोकियो आॅलिम्पिक २०२० साठी हे प्रायोजनपद होते. आॅलिम्पिक वर्षभरासाठी लांबणीवर पडल्यामुळे सरावाची चिंता दूतीला सारखी बोचत आहे.
ओडिशा खनिकर्म विभागाची कर्मचारी असलेली दूती पुढे म्हणाली, ‘कोरोनामुळे जगातील अर्थव्यवस्थेला फटका बसला. सध्या मूलभूत गरजांवर लक्ष्य केंद्रित असल्याने मला प्रायोजक मिळेलच असे नाही. जर्मनीत तीन महिने सरावासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. त्याचे पैसे बुडीत गेले. याशिवाय २० लाख रुपये अग्रिम भरले होते, तेदेखील मिळण्याची शक्यता कमी आहे. सराव थांबल्यामुळे माझा धावण्याचा वेग कमी झाला. हा वेग कायम करण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत.’
आॅक्टोबरमध्ये सरावाला हळूहळू सुरुवात होते तेव्हा मार्चमध्ये धावण्यास वेग येतो. जर्मनीत सरावाद्वारे मी वेगवान धावून वेळेचे नियोजन करणार होते. पण आशेवर पाणी फेरले आहे.
आॅलिम्पिकचे आयोजन होईलच याचीदेखील शाश्वती नाही. कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे शिवाय लस आलेली नाही. भारतात अॅथ्लेटिक्स सरावाच्या अॅडव्हान्स सुविधा नाहीत. आॅलिम्पिक पात्रतेसाठी विदेशात सराव फारच आवश्यक असल्याचे दूतीचे मत आहे. भारताच्या जितक्या खेळाडूंनी आॅलिम्पिकची पात्रता गाठली ती विदेशातील तयारीच्या बळावरच, असेही दूतीने सांगितले. (वृत्तसंस्था)