मोर्कल उल्लेखनीय ठरला - डिव्हिलियर्स
By admin | Published: October 20, 2015 02:37 AM2015-10-20T02:37:21+5:302015-10-20T02:37:21+5:30
डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करीत दक्षिण आफ्रिका संघाला भारताविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोलंदाज मोर्नी मोर्कलची
राजकोट : डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करीत दक्षिण आफ्रिका संघाला भारताविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोलंदाज मोर्नी मोर्कलची दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने प्रशंसा केली. मोर्कलच्या पाय सुजलेला असतानाही त्याने अचूक मारा केला, असे डिव्हिलियर्स म्हणाला.
डिव्हिलियर्सने सांगितले की,‘सहा षटके गोलंदाजी केल्यानंतर मोर्नीने त्याच्या पायावर सूज असल्याचे सांगितले. त्याने परतीच्या स्पेलमध्ये चांगला मारा केल्यामुळे अखेरच्या षटकांसाठी त्याचे एक षटक राखून ठेवावे लागले. मैदान सोडून जाणे त्याला सहज शक्य होते, पण पायावर सूज असतानाही त्याने मैदान न सोडता अचूक मारा केला आणि विजयाचा शिल्पकार ठरला.’ विजयासाठी २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. डिव्हिलियर्सने यष्टिरक्षक क्विंटन डिकॉकची प्रशंसा केला. डिकॉकने ११८ चेंडूंना सामोरे जाताना १०३ धावा फटकावल्या. डिव्हिलियर्स म्हणाला,‘खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि अखेरपर्यंत हार न मानता संघर्ष कायम राखला. मी सामन्यापूर्वी आणि सामन्यादरम्यानही संघाच्या बैठकीमध्ये याचा पुनरुच्चार केला. डिकॉकने शानदार कामगिरी
केली. फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. खेळाडू म्हणून तो परिपक्व झाला आहे. त्याने शतकी खेळी करीत टीकाकारांना चोख उत्तर दिले.’ (वृत्तसंस्था)
चौथ्या वन-डेत मोर्कलच्या खेळण्याबाबत साशंकता
तिसऱ्या वन-डे सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकाला भारताविरुद्ध विजय मिळवून देणाऱ्या मोर्कलच्या २२ आॅक्टोबरला होणाऱ्या चौथ्या वन-डेत खेळण्याबाबत साशंकता आहे.
मोर्कल म्हणाला,‘मला दुखापतीची चिंता सतावत आहे. आमचे वैद्यकीय पथक चांगले असून आगामी दोन दिवसांमध्ये त्यांची मदत मिळेल. मला सहाव्या षटक्यात दुखापत झाली. यानंतरच्या लढतीत मी खेळू शकेल, असे मला वाटत नाही. आगामी २४ तासांमध्ये दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होईल.’
चौथी लढत चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होईल. मोर्कलने तिसऱ्या सामन्यात ३९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने विराट कोहली (७७) आणि अजिंक्य रहाणे यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.