बायोपिक सर्वात अवघड इनिंग!

By admin | Published: May 25, 2017 01:33 AM2017-05-25T01:33:02+5:302017-05-25T01:33:02+5:30

जागतिक क्रिकेटच्या इतिहासात रेकॉर्डचा कीर्तिमान रचणारा, ज्याला ‘क्रिकेटचा देव’ असे संबोधले जाते, त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित चित्रपट येत असल्याने

The most difficult innings of biopic! | बायोपिक सर्वात अवघड इनिंग!

बायोपिक सर्वात अवघड इनिंग!

Next

जागतिक क्रिकेटच्या इतिहासात रेकॉर्डचा कीर्तिमान रचणारा, ज्याला ‘क्रिकेटचा देव’ असे संबोधले जाते, त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित चित्रपट येत असल्याने, त्याच्या चाहत्यांना आता मैदानाबरोबरच मैदानाबाहेरीलही सचिन अनुभवता येणार आहे. ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या बायोपिकमधून सचिनच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले जाणार असल्याने, या महान खेळाडूने जग कसे जिंकले, याचा थक्क करणारा प्रवास पडद्यावर बघावयास मिळणार आहे. या चित्रपटानिमित्त ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी सचिनशी संवाद साधला असता, त्याने दिलखुलासपणे या नव्या इनिंगचा उलगडा केला आहे.

क्रिकेटमधून निवृत्त होऊन साडेतीन वर्षे झाली, निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे आहे?
आयुष्य मजेत जात आहे, मी अनेक गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले आहे. अनेक क्षेत्रांतील लोकांना भेटण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळत आहे. त्याचबरोबर, भरपूर प्रवासही होत आहे. ज्या लोकांनी मला २४ वर्षांच्या कारकिर्दीत प्रोत्साहन दिले, अशा लोकांना भेटणे हे खरोखरच आनंददायी आहे. त्यातील काही आपल्या देशातील आहेत, तर काही जगभरातील विविध परिसरातील आहेत.
तुझ्या ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’  या चित्रपटाविषयी काय सांगशील?
माझ्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्व घडामोडी, चढउतार, धावांचे आकडे हे माझ्या चाहत्यांना चांगले माहीत आहेत, पण या २४ वर्षांत माझ्या व्यक्तिगत आयुष्यात कुठले चढउतार आले, कुठली आव्हाने होती, जे मी पेलली, त्याचे चित्रीकरण आम्ही या चित्रपटात केले आहे. पाच वर्षांचा सचिन आम्ही तिथेच चित्रित केला, जिथे मी खरोखरच पाच वर्षांचा असताना राहिलो होतो. आम्ही त्यासाठी साहित्य सहवास येथे जाऊन ज्या ठिकाणी मी गल्लीत क्रिकेट खेळलो, तिथेच चित्रपटाचे चित्रीकरण केले. मी वयाच्या ११व्या वर्षांपासून शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळायला जायला लागलो, त्याचेही चित्रीकरण आम्ही तिथेच केले. माझ्या जीवनातील
चढउतार, आव्हाने याविषयी माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही या चित्रपटात त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. माझ्या चाहत्यांना माझ्याविषयी जे जाणून घ्यायचे आहे, ते या चित्रपटात दाखविण्याचा मी प्रयत्न केला आहे. चित्रपटात माझ्या खासगी जीवनाविषयी सांगताना, ते अवघड रितीने मांडले जाणार नाहीत किंवा प्रेक्षकांना बघतानाही कंटाळा येणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे. अंजलीने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी माझ्यासाठी काय केले, याचेही चित्रीकरण यात करण्यात आले आहे.

निर्माता म्हणून तू रवी भागचंदका यांचीच का निवड केली?
माझ्या एका मित्राच्या माध्यमातून रवी त्याच्या चित्रपटाची कल्पना घेऊन माझ्याकडे आला. मी त्याला पहिल्यांदा विचारले होते की, तुला खात्री आहे का की, तू चित्रपट बनविणार आहेस? त्याने आत्मविश्वासाने लगेचच ‘हो’ असे उत्तर दिले. हीच
बाब मला भावली. वास्तविक, चित्रपटात काम
करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. कारण
खेळाडू हा आयुष्यभर खेळाडूच असतो. मला
मान्य आहे की, मी बऱ्याच वेळा कॅमेऱ्याला सामोरे
गेलो आहे, पण अभिनय या गोष्टीशी माझा
कधीही संबंध आला नाही. याची मी रवीला
कल्पना दिली होती, परंतु त्याने मला विश्वास दिला. मग मीही असा विचार केला की, खेळाच्या मैदानावरची आव्हाने आपण पेलली आहेत, आता अभिनयाचेही आव्हाने पेलून बघू. त्यानंतरच मी रवीला होकार दिला.

तुझी भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी तुला कोणता अभिनेता योग्य वाटतो?
मला हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. खरे तर याचे उत्तर देणे माझ्यासाठी अवघड आहे. तरीसुद्धा मला असे वाटते की, माझी भूमिका अभिनेता आमीर खान चांगल्या पद्धतीने पडद्यावर साकारू शकेल. कारण क्रिकेटची आठवण झाली की, आमीर खानच्या ‘लगान’चीही आठवण होतेच. त्यातच त्याला मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जात असल्याने, तो या भूमिकेसाठी मला योग्य वाटतो.

चित्रपटाचे प्रमोशन करणे तुझ्यासाठी कितपत अवघड होते?
खरे तर प्रमोशन करणे खूपच अवघड होते. कारण त्यासाठी मला खूप प्रवास करावा लागला. तसा मी क्रिकेटच्या काळातही खूप प्रवास केला आहे, पण प्रमोशनचा प्रवास वेगळा होता. क्रिकेट माझ्या हृदयाचा भाग आहे, पण कॅमेऱ्याला सामोरे जाणे, डायलॉग बोलणे हे सगळे क्रिकेटपेक्षा अगदीच वेगळे आहे. त्या काळातही कॅमेऱ्याच्या सामोरे गेलो आहे, पण या वेळी सगळेच वेगळे होते.

या चित्रपटातसुद्धा तू शतक झळकावशील, असे तुला वाटते काय?
अजून तर सामनाही सुरू झालेला नाही. तशी आम्ही भरपूर तयारी केलेली आहे. चित्रपट उत्कृष्ट व्हावा, म्हणून आम्ही सर्व प्रामाणिक प्रयत्न केला आहे. उत्कृष्ट चित्रपटासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आहेत. चित्रपट बघणारा नाउमेद होणार नाही, याचीही आम्ही काळजी घेतली आहे. आमचे सर्वोत्तम आम्ही दिलेले आहे. आता शेवटचा निकाल प्रेक्षकांच्या हातात आहे.
आयुष्यातला एखादा असा क्षण सांग, जिथे तुझी निराशा झाली असेल?
मैदानावर असे बरेच क्षण येत असतात. त्यामुळे एखादाच असा निश्चित क्षण सांगणे कठीण आहे. या चित्रपटात आम्ही माझ्या आयुष्यातील यश-अपयश असे सगळेच अनुभव आणि क्षण दाखविले आहेत.

तुला कोणत्या खेळाडूंवरील बायोपिक बघायला आवडेल?
या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. कारण जगभरात अनेक महान खेळाडू आहेत, परंतु उत्तर द्यायचे झाल्यास मला टेनिस स्टार रॉजर फेडरर याच्यावर आधारित बायोपिक बघायला आवडेल. वास्तविक, खेळाडूंवरील बायोपिक प्रेक्षकांना त्या खेळाडूंच्या जवळ घेऊन जात असतो. मी अनेक खेळाडूंवर आधारित बायोपिक बघितले आहेत. त्यात मला फॉम्युर्ला वनवर आधारित ‘रश’ हा बायोपिक खूप आवडला आहे.

सचिन तू चांगला गायक असून, या चित्रपटातून
प्रेक्षकांना तुझा आवाज ऐकायला मिळणार काय? नाही, मी चांगला गायक असण्यापेक्षा चांगला श्रोता आहे. मी गाण्यावर बोलू शकतो, गाऊ शकत नाही. माझे नाव संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरूनच ठेवण्यात आलेले आहे.

विराट कोहली, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग
यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला गेल्यास, त्यास काय नाव देण्यात यावे असे तुला वाटते?
अवघड प्रश्न आहे. कारण आमच्या चित्रपट निर्मितीच्या दोन वर्षांच्या काळात माझ्या चित्रपटाला काय नाव द्यायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ही प्रक्रिया खूपच अवघड होती. त्यासाठी आम्हाला चाहत्यांमधून लाखो सूचना आल्या. बायोपिकला नाव द्यायचे झाल्यास, विराट कोहलीची वृत्ती फार चिवट आहे, म्हणून मी त्याच्या बायोपिकला ‘नेव्हर से डाय’ असे नाव देईल. सौरव गांगुलीला मी लहानपणापासून ओळखतो. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा माझे वय १२ किंवा १३ असेल. त्याच्या बायोपिकसाठी नाव सुचवायचे झाल्यास मी ‘दादा’ असे नाव देईल. राहुल द्रविडच्या बायोपिकला ‘द वॉल’ हे नाव योग्य असेल, तर वीरेंद्र सेहवागच्या बायोपिकला ‘रॉलर कोस्टर’ हे नाव मी सुचवेल.

Web Title: The most difficult innings of biopic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.