डोपिंगमध्ये अडकले सर्वाधिक भारतीय, नमुन्यांचा तपास करण्यात ११ वे स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 05:49 AM2024-04-05T05:49:29+5:302024-04-05T05:51:44+5:30
Doping: प्रतिवर्षी दोन हजार किंवा त्याहून अधिक खेळाडूंची डोपिंग चाचणी करणाऱ्या देशांमध्ये २०२२ ला डोपिंगचे दोषी ठरलेल्यांची सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे.
नवी दिल्ली - प्रतिवर्षी दोन हजार किंवा त्याहून अधिक खेळाडूंची डोपिंग चाचणी करणाऱ्या देशांमध्ये २०२२ ला डोपिंगचे दोषी ठरलेल्यांची सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. विश्व डोपिंगविरोधी एजन्सीद्वारा (वाडा) बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात रक्त आणि लघवीचे ३८६५ नमुने घेण्यात आले होते. त्यात १२५ जण पॉझिटिव्ह आढळले. नमुन्यांच्या संख्येपैकी ही ३.२ टक्के आहे.
डोपिंगमध्ये अडकणाऱ्यांच्या यादीत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. नमुन्यांचा तपास करण्यात भारताचा ११ वा क्रमांक लागतो. रशिया (८५), अमेरिका (८४), इटली (७३) आणि फ्रान्स (७२) या क्रीडा महाशक्तींमध्ये भारतात डोपिंग करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दक्षिण आफ्रिकेने २०२३ नमुन्यांचा तपास केला. त्यात २.९ टक्के पॉझिटिव्ह आढळले. तिसऱ्या स्थानावर कझाकिस्तान आहे. त्यांनी २१७४ नमुने तपासले. त्यापैकी १.९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. चौथ्या स्थानावर नॉर्वे आणि अमेरिका आहे. चीनने विक्रमी १९२२८ नमुन्यांचा तपास केला. त्यात पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या ०.२ टक्का इतकी आहे. डोपिंगमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून निलंबनाची नामुष्की झेलणाऱ्या रशियाने १०१८६ नमुन्यांचा तपास केला. त्यात ०.८ टक्का नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.