क्रीडा क्षेत्रातील हालचालींना वेग, सामने प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:36 AM2020-05-17T00:36:36+5:302020-05-17T00:36:48+5:30
आता सुरू होणारे सर्व सामने हे प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. याचा आनंद टीव्ही व डिजिटल माध्यमातूनच घेतला जाऊ शकेल.
- अयाझ मेमन
कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून पूर्णत: थांबलेल्या क्रीडा क्षेत्रात थोडीफार हालचाल दिसू लागली आहे. बुंदेसलिगा या जर्मन फुटबॉल लीगला शनिवारी सुरुवात झाली, तर आॅस्ट्रेलियातील राष्ट्रीय रग्बी लीग २८ मे रोजी सुरूहोणार आहे.
त्याचबरोबर अमेरिकन बास्केटबॉल (एनबीए) व बेसबॉल (एमएलबी) लीगही लवकरच सुरूकरण्याचा प्रयत्न आहे. आता सुरू होणारे सर्व सामने हे प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. याचा आनंद टीव्ही व डिजिटल माध्यमातूनच घेतला जाऊ शकेल. जोपर्यंत कोविड-१९ वर एखादी लस सापडत नाही तोपर्यंत अशाचप्रकारे सामने आयोजित करावे लागणार आहेत. याासाठी वर्षभराचा काळ लागू शकतो, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
प्रेक्षकांची उपस्थिती हा कोणत्याही खेळाचा प्राण असतो; मात्र आता अशा प्रकारच्या सामन्यांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतो हे पाहावे लागणार आहे. रिकाम्या स्टेडियमवर खेळताना खेळाडूंना पाहणे प्रेक्षकांना कितपत रुजेल हे सांगणे कठीण आहे. आता तंत्रज्ञान खूपच विकसित झाले आहे. त्यामुळे तंत्राच्या मदतीने मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती दाखविणे शक्य होऊ शकते. खेळाडूंना प्रेक्षकांसमोर खेळल्याचा अनुभव दिला जाऊ शकतो. कोविड नंतरच्या जगात कशा प्रकारचे जीवन जगावे लागणार आहे. आपल्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत, याची ही थोडीशी झलकच आहे.
मी माझ्या टिष्ट्वटर अकाऊंटवर या संदर्भात एक चाचणी घेतली. यात मी विचारले होेते की, रिकाम्या स्टेडियमवर सामने घेण्याचा विचार योग्य वाटतो? यावर मला काही पर्याय देण्यात आले, ते असे १) होय, आम्हाला पुन्हा सामने हवेत २) माफ करा, मी पाहू शकत नाही ३) कोणत्याही मार्गाने सामने खेळवा, काही फरक पडत नाही ४) मी वाट पाहीन आणि ठरवेन.
विशेष म्हणजे ६४८ लोकांपैकी ५८ टक्के लोकांनी पहिल्या पर्यायाला पसंती दिली. यावरूनच लोकांना सामने सुरू होण्याची किती प्रतीक्षा आहे हे दिसून येते. मी लिहित असताना अद्याप बुंदेसलिगा सुरूझाली नव्हती. या आणि आगामी आठवड्यात सुरूहोणाऱ्या क्रीडा स्पर्धांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे महत्त्वाचे असेल.
दरम्यान, भारतीय क्रिकेट रसिकांबरोबरच जगभरातील क्रिकेटपटू व प्रेक्षकांना आयपीएलबाबत काय याची उत्सुकता लागली आहे. यावर्षी ही स्पर्धा होणार का? याऐवजी टी-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळविली जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे.
याचे माझ्याकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. मात्र, रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, यावर्षी कोणत्याही मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धांऐवजी स्थानिक स्पर्धा व द्विपक्षीय मालिका खेळविल्या जाण्यावर भर दिला जाईल. आयपीएल ही स्थानिक स्पर्धा असल्याने याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
आयसीसीने २ मे रोजी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आगामी चार महत्त्वाच्या स्पर्धांवर चर्चा केली. यात कोविड-१९ सावटाखाली टी-२० विश्वचषक खेळवायचा का, यावरही चर्चा झाली.
मात्र, ही स्पर्धा २०२२ पर्यंत पुढे ढकलावी, असा चर्चेत सूर होता. ही स्पर्धा आयोजित करणाºया आॅस्ट्रेलियाचाही याला विरोध नव्हता असे कळते. पुढील दहा दिवस क्रीडा प्रशिक्षकांसाठी मोठ्या डोकेदुखीचे असतील, हे मात्र नक्की!