‘एमपी’ने मल्लखांब दत्तक घेतले, महाराष्ट्राचे काय? पद्मश्री उदय देशपांडे यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:11 PM2024-01-31T12:11:02+5:302024-01-31T12:11:47+5:30
Uday Deshpande: ‘मल्लखांब हा आपला खेळ असल्याची जाणीव राज्य सरकारला करून द्यावी लागेल. कारण, मध्य प्रदेशने मल्लखांबला दत्तक घेतले आहे; पण आपल्या महाराष्ट्राचे काय? यासाठी मी राज्य सरकारशी योग्य ती चर्चा करणार आहे,’ असे मल्लखांबला जागतिक ओळख मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.
- रोहित नाईक
मुंबई - ‘मल्लखांब हा आपला खेळ असल्याची जाणीव राज्य सरकारला करून द्यावी लागेल. कारण, मध्य प्रदेशने मल्लखांबला दत्तक घेतले आहे; पण आपल्या महाराष्ट्राचे काय? यासाठी मी राज्य सरकारशी योग्य ती चर्चा करणार आहे,’ असे मल्लखांबला जागतिक ओळख मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.
भारत सरकारने देशपांडे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कार यादीतून कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स-स्नूकर, जिमनॅस्टिक्स आणि मॉडर्न पेंटाथलॉन या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला होता.
याविरोधात या राज्य क्रीडा संघटनांनी एकत्रित येत विरोध दर्शविल्यानंतर पुन्हा एकदा या खेळांचा या पुरस्कार यादीत समावेश झाला. यासाठी या राज्य क्रीडा संघटनांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या कृतज्ञता सभेदरम्यान देशपांडे यांचा सत्कार केला. यावेळी देशपांडे म्हणाले की, ‘मल्लखांबला दत्तक घेण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांना वैयक्तिक भेटून माझी व्यथा मांडणार आहे. महाराष्ट्राने मल्लखांबला राजाश्रय देऊन या खेळाच्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करावे, ही माझी अपेक्षा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मल्लखांब विजेत्यांना दरमहा १० हजार रुपये अशी वर्षाला एक लाख २० हजार रुपये शिष्यवृत्ती सुरू केली आहे. भारतात शंभरहून अधिक केंद्रावर मल्लखांबसाठी पाच लाखांचे क्रीडा साहित्य अनुदान उपलब्ध करून दिले.
याशिवाय, प्रशिक्षकाला दरमहा ३५-४० हजार रुपये दरमहा वेतन सुरू केले. खेलो इंडियामध्ये मल्लखांबचा समावेश झाला. त्यामुळे मल्लखांबमध्ये सकारात्मक बदल होईल, अशी माझी खात्री आहे.’
मल्लखांबच्या ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेतील समावेशाचे आपण स्वप्न पाहतोय पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच मल्लखांबला मोठा संघर्ष करावा लागला. कारण, मल्लखांबकडे पूर्वी व्यायामप्रकार म्हणून पाहिले जात होते. यानंतर भारतीय मल्लखांब महासंघाने कित्येक वर्ष राष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. त्यामुळेच आज मल्लखांबमध्ये अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मिळाले आणि आता पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यामुळे निश्चितच सकारात्मक बदल होतील.
- उदय देशपांडे