बहुप्रतीक्षित द. आशियाई क्रीडा स्पर्धा आजपासून

By admin | Published: February 5, 2016 03:36 AM2016-02-05T03:36:00+5:302016-02-05T03:36:00+5:30

विविध कारणांमुळे अनेकदा स्थगित कराव्या लागलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला (सॅग) आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे

Much anticipated Asian Games Contest From today | बहुप्रतीक्षित द. आशियाई क्रीडा स्पर्धा आजपासून

बहुप्रतीक्षित द. आशियाई क्रीडा स्पर्धा आजपासून

Next

गुवाहाटी : विविध कारणांमुळे अनेकदा स्थगित कराव्या लागलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला (सॅग) आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आठ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धा १२ दिवस चालतील. यजमान भारत पूर्वापार चालत असलेले वर्चस्व कायम राखण्याचे प्रयत्न करणार आहे.
२५०० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन इंदिरा गांधी अ‍ॅथ्लेटिक्स स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत. द. आशियाई आॅलिम्पिक परिषदेच्या यजमानपदाखाली आयोजित ही स्पर्धा तब्बल चार वर्षे विलंबाने होत आहे. १२ व्या सॅग क्रीडा स्पर्धेचे आयोजन २०१२ मध्ये नवी दिल्लीत होणार होते. राजधानीतील विधानसभा निवडणुकांमुळे स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यानंतर भारतीय आॅलिम्पिक संघटनेला आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेने डिसेंबर २०१२ व फेब्रुवारी २०१४ या काळासाठी निलंबित केल्याने स्पर्धेचे आयोजन लांबणीवर पडले होते. आयओसीने आयओएवरील बंदी मागे घेतल्यानंतर स्पर्धेचे आयोजन केरळमध्ये होईल, असे वृत्त आले होते. पण मागच्या वर्षी उशीर झाल्यानंतर या स्पर्धेचे आयोजन गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये करण्याची घोषणा झाली. भारतात तिसऱ्यांदा स्पर्धा होत आहेत. याआधी १९८७ साली कोलकाता तसेच १९९५ साली चेन्नईमध्ये सॅग क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले आहे.
२०१० च्या स्पर्धा ढाका येथे झाल्या होत्या. त्यात भारताने ५२८ पैकी १७५ पदके जिंकली. त्यात ९० सुवर्णांचा समावेश होता. पाकिस्तान ८० पदकांसह (१९ सुवर्ण) दुसऱ्या स्थानावर होता. ढाका येथे २३ क्रीडा प्रकारात २००० खेळाडू होते तर यंदा २३ क्रीडा प्रकारातील २२८ स्पर्धांमध्ये २५०० खेळाडूंचा समावेश असेल.
स्पर्धेत २२८ सुवर्ण, २२८ रौप्य आणि ३०८ कांस्य पदकांसाठी चढाओढ राहील. यजमान दोन्ही शहरांमध्ये स्पर्धेनिमित्त ३३३३ खेळाडू आणि अधिकारी येणार आहेत. ‘जेंडर इक्वल गेम’ या मोहिमेअंतर्गत पहिल्यांदा पुरुष आणि महिला गटासाठी सारख्या स्पर्धांचे आयोजन होत आहे. स्पर्धेचा एकूण खर्च १५० कोटी रुपये आहे. याशिवाय चोख बंदोबस्त रहावा यासाठी केंद्र सरकारने आसामला ६० तर मेघालय सरकारला सात कोटीचा अतिरिक्त निधी दिला आहे. (वृत्तसंस्था)बास्केटबॉल ‘आऊट’
या स्पर्धेच्या उद्घाटनाआधीच आयोजनाला धक्का लागला आहे. फिबाने स्पर्धेतील बास्केटबॉल प्रकार रद्द केला. बास्केटबॉलचे आयोजन ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होते. यात सहभागी होऊ नये असे फिबाद्वारे कळविण्यात आले आहे. आयोजनात सरकार आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेचा हस्तक्षेप असल्याने फिबाने हा निर्णय घेतल्याचे कळते. फिबाने भारतीय बास्केटबॉल संघटनेच्या एका गटाला मान्यता दिली आहे तर आयओने दुसऱ्या गटाला मान्यता प्रदान केली. आयओएने स्पर्धेत भाग घेणारा संघ निवडला असून फिबाद्वारा मान्यता प्राप्त गटाने आपला दुसरा संघ निवडला होता. बास्केटबॉल सुरू होण्यास आठवडा असल्याने या काळात तोडगा निघण्याची आयोजकांना आशा आहे.

Web Title: Much anticipated Asian Games Contest From today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.