न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या फलंदाजांचे वर्चस्व

By admin | Published: September 18, 2016 05:34 AM2016-09-18T05:34:40+5:302016-09-18T05:34:40+5:30

फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले.

Mumbai batsmen dominate against New Zealand | न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या फलंदाजांचे वर्चस्व

न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या फलंदाजांचे वर्चस्व

Next


नवी दिल्ली : पाटा खेळपट्टीवर रोहित शर्मा धावा फटकावण्यात अपयशी ठरला, पण त्याचे मुंबईकर सहकारी कौस्तुभ पवार व सूर्यकुमार यादव यांनी शतके झळकावित फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले.
रोहितला कामगिरीत सातत्य राखता आले नसले, तरी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो भारतीय संघात स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. सराव सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचा दावा मात्र त्याला सादर करता आला नाही.
पाटा खेळपट्टीवर रोहितचा अपवाद वगळता पवार (२२८ चेंडू, १०० धावा), यादव (८६ चेंडू, १०३ धावा), सिद्धेश लाड (६२ चेंडू, नाबाद ८६ धावा) व अरमान जाफर (१२३ चेंडू, ६९ धावा) या मुंबईकर फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. कालच्या १ बाद २९ धावसंख्येवरून पुढे खेळताना शनिवारी दुसऱ्या दिवसअखेर मुंबई संघाने पहिल्या डावात ५ बाद ४३१ धावांची मजल मारली होती. न्यूझीलंडने शुक्रवारी पहिल्या दिवशी ७ बाद ३२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला होता. आज मुंबई संघाने ९० षटकांत ४.४६च्या सरासरीने ४०२ धावा फटकावल्या.
पाहुण्या संघासाठी आजचा दिवस खडतर ठरला. त्यांच्या गोलंदाजांना उष्ण वातावरणात घाम गाळावा लागला, पण त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. पाटा खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांकडून विशेष अपेक्षा नसली, तरी फिरकीपटूंनाही मात्र अपेक्षित यश लाभले नाही. न्यूझीलंडचे फिरकी त्रिकुट सोढी (२-१३२), मिशेल सँटेनर (१-७१) आणि मार्क क्रेग (६० धावांत बळी नाही) महागडे ठरले.
कसोटी मालिकेचा विचार करता भारतासाठी निराशाजनक बाब म्हणजे रोहितचे झटपट बाद होणे. जाफर बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रोहितला खाते उघडण्यासाठी १० चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. त्याने लेगस्पिनर ईश सोढीच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत डावाची सुरुवात केली. त्याच्या १८ धावांच्या खेळीत तो एकमेव चांगला फटका होता. सोढीच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत फटका मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचित झाला. त्यानंतर खेळपट्टीवर पवारला साथ देण्यासाठी यादव उतरला. (वृत्तसंस्था)
यादवने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेतला. त्याने वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंवरही वर्चस्व गाजवले. त्याने वैयक्तिक अर्धशतक व शतक षटकाराच्या साह्यने पूर्ण केले. यादवच्या शतकी खेळीत ८ षटकार व ९ चौकारांचा समावेश आहे. पवार व यादव यांनी चौथ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. पवार शतक पूर्ण केल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर लाड व आदित्य तारे (नाबाद ५३) यांनी आक्रमक फलंदाजी केली. शनिवारी कोटलावर षटकार-चौकारांचा पाऊस अनुभवायला मिळाला. (वृत्तसंस्था)
>मुंबईने आम्हाला दडपणाखाली आणले : ब्रेसवेल
एकमेव सराव सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी मुंबईने ४०२ धावा फटकावत आम्हाला दडपणाखाली आणले, अशी कबुली न्यूझीलंडचा अष्टपैलू वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेल याने दिली.
न्यूझीलंडने शुक्रवारी पहिला डाव ७ बाद ३२४ धावसंख्येवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात खेळताना मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ४३१ धावांची मजल मारली.
दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ब्रेसवेल म्हणाला, ‘मुंबईच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्यांनी आमच्यावर वर्चस्व गाजविले. अद्याप एक दिवसाचा खेळ शिल्लक असून, आम्ही सकारात्मक विचार करीत आहोत. खेळपट्टीवर चेंडू वळत नव्हता.
पंडित म्हणाले, ‘रोहितने शतकी खेळी केली असती, तर आनंद झाला असता. त्याचा अपवाद वगळता उर्वरित फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. आम्ही अद्याप डाव घोषित करण्याबाबत विचार केलेला नाही.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Mumbai batsmen dominate against New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.