मुंबईचा कोलकातावर 9 धावांनी विजय
By admin | Published: May 14, 2017 12:23 AM2017-05-14T00:23:17+5:302017-05-14T00:30:20+5:30
ईडन गार्डनवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईनं कोलकाताला पराभवाची धूळ चारली
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 14 - ईडन गार्डनवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईनं कोलकाताला पराभवाची धूळ चारली आहे. मुंबईनं कोलकातावर 9 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईनं दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताला 8 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकांत 164 धावा करता आल्या आहेत. मुंबईच्या अंबाती रायुडूला मॅन ऑफ द मॅच या किताबानं गौरवण्यात आलं आहे.
टीम साऊदीनं सुरुवातीलाच नारायणला शून्यावर घरचा रस्ता दाखवून कोलकाताच्या धावसंख्येला लगाम घातला. विनयकुमारनं ख्रिस लीनला बाद करत कोलकाताला 4था धक्का दिला.लीननं 14 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकार लगावत 26 धावा केल्या. कर्ण शर्माननं भेदक गोलंदाजीच्या जोरावर गौतम गंभीर (21) आणि रॉबिन उथप्पा(02) यांचे बळी घेत कोलकाताला जबरदस्त हादरा दिला. हार्दिक पांड्यानं मैदानावर आलेल्या मनीष पांडेयला बाद करत कोलकाताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. मनीष पांडेयनं 13 धावा काढल्या. हार्दिकनं कोलिन ग्रँडहोमला क्लीन बोल्ड करत कोलकाताला 6वा झटका दिला.
तत्पूर्वी ग्रँडहोमनं 29 धावांचं योगदान दिलं होतं. अंबाती रायडू (63) आणि सलामीवीर सौरभ तिवारी (52) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 173 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून बाऊल्टने सर्वाधिक 2 तर, कुलदीप यादव आणि राजपूतने प्रत्येकी एक विकेट घेतला होता.