मुंबईची महाराष्ट्रावर मात

By admin | Published: January 9, 2016 03:18 AM2016-01-09T03:18:56+5:302016-01-09T03:18:56+5:30

कर्णधार आदित्य तरेने केलेल्या शानदार कॅप्टन्स इनिंगच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला ८ विकेट्सने नमवले

Mumbai beat Maharashtra | मुंबईची महाराष्ट्रावर मात

मुंबईची महाराष्ट्रावर मात

Next

कटक : कर्णधार आदित्य तरेने केलेल्या शानदार कॅप्टन्स इनिंगच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला ८ विकेट्सने नमवले. विशेष म्हणजे अन्य एका सामन्यात यूपीने सेनादल संघाला नमवल्याचा फायदा मिळाल्याने मुंबईने स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत प्रवेश केला. यूपीने सर्वधिक २० गुणांसह ‘ड’ गटात अग्रस्थान पटकावले. तर मुंबई व महाराष्ट्राने प्रत्येकी १२ गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले.
नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धवल कुलकर्णीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर महाराष्ट्राने डाव सावरताना निर्धारीत २० षटकांत ८ बाद १५५ धावांची समाधानकारक मजल मारली. या आव्हानाच पाठलाग करताना अखिल हेरवाडकर - श्रेयश अय्यर यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली. हेरवाडकर १५ चेंडूत २१ धावा काढून परतल्यानंतर श्रेयश व आदित्य यांनी ४९ धावांची भागीदारी करुन मुंबईला सावरले.
अय्यर २३ चेंडूत ३८ धावा काढून सत्यजीत बच्चवचा शिकार ठरला. यानंतर मात्र आदित्य आणि सिध्देश लाड यांनी अखेरपर्यंत नाबाद राहताना ८३ धावांची तुफानी भागीदारी करुन मुंबईला १६.१ षटकांत विजयी केले. आदित्यने ३९ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. तर सिध्देशने २० चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ३१ धावा काढल्या.
तत्पूर्वी पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर महाराष्ट्राने संयमी खेळी करताना ८ बाद १५५ धावांची मजल मारली. प्रयाग भाटी (३६) आणि निखिल नाईक (३१) यांनी उपयुक्त खेळी करताना संघाला दिडशेचा पल्ला गाठून देण्यात मदत केली. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, सागर त्रिवेदी व अभिषेक नायर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.

Web Title: Mumbai beat Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.