मुंबईने उडविला गोव्याचा धुव्वा
By Admin | Published: March 7, 2017 04:22 AM2017-03-07T04:22:16+5:302017-03-07T04:22:16+5:30
गोव्याचा ८ विकेट्सने धुव्वा उडवल्यानंतरही मुंबईला विजय हजारे क्रिकेट चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही.
मुंबई : गोव्याचा ८ विकेट्सने धुव्वा उडवल्यानंतरही मुंबईला विजय हजारे क्रिकेट चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. धावगतीच्या जोरावर गुजराने बाजी मारली. मुंबईने गोवाला अवघ्या ९५ धावांवर तबूंत पाठविले. हे लक्ष्य मुंबईने अवघ्या ५.४ षटकांत २ गडी गमावून गाठले.
गोव्याने प्रथम फलंदाजी केली. हा निर्णय गोव्याच्या अंगलट आला. सगुण कामत (२३) आणि दर्शन मिसाळ (२२) या दोघांची सर्वाधिक धावसंख्या ठरली.अभिषेक नायर (२३/४), धवल कुलकर्णी (१७/३) व शार्दुल ठाकूर (२७ /२) यांनी अचूक मारा केला. यानंतर, मुंबईची सुरुवात वाईट झाली. रोहित शर्मा (४), श्रेयश अय्यरही (१४) झटपट परतले. मात्र, सूर्यकुमार यादव (४०*), आदित्य तरे (३८*) यांनी केवळ ५.४ षटकात मुंबईला विजयी केले. सुर्यकुमारने ११ चेंडूत ४ चौकार व ३ षटकार तर तरेने ११ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. (क्रीडा प्रतिनिधी)
>संक्षिप्त धावफलक : गोवा : ३५ षटकात सर्वबाद ९५ धावा (सगुन कामत २३, दर्शन मिसाळ २२; अभिषेक नायर ४/२३, धवल कुलकर्णी ३/१७) पराभूत वि. मुंबई : ५.४ षटकात २ बाद ९९ धावा (सुर्यकुमार यादव नाबाद ४०, आदित्य तरे नाबाद ३८; फेलिक्स अलेमाव १/३२, सौरभ बांदेकर १/५२)