मुंबईची पराभवाची हॅट्ट्रिक!

By Admin | Published: April 15, 2015 03:07 AM2015-04-15T03:07:19+5:302015-04-15T03:07:19+5:30

स्मिथने ५३ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७९ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर राजस्थानने मुंबईचे १६५ धावांचे आव्हान १९.१ षटकांत ७ गडी राखून गाठले

Mumbai defeat hat-trick! | मुंबईची पराभवाची हॅट्ट्रिक!

मुंबईची पराभवाची हॅट्ट्रिक!

googlenewsNext

राजस्थानचा ७ गडी राखून विजय : स्मिथचे नाबाद अर्धशतक
अहमदाबाद : विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सवर पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की ओढवली. स्टीव्हन स्मिथच्या धुवाधार (नाबाद ७९) खेळीने मुंबईची निराशा केली. त्यांचा हा सलग तिसरा पराभव ठरला. दुसरीकडे, राजस्थानने विजयाची हॅट्ट्रिक साधली. स्मिथने ५३ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७९ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर राजस्थानने मुंबईचे १६५ धावांचे आव्हान १९.१ षटकांत ७ गडी राखून गाठले.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानचा सलामीवीर संजू सॅमसनला १७ धावांवर बाद करून मुंबईने समाधानकारक सुरुवात केली होती. विनयकुमारने हा पहिला बळी मिळवून दिला. सॅमसन तंबूत परतल्यानंतर मात्र राजस्थानच्या अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथ या जोडीने शानदार फटकेबाजी केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली. यामध्ये अंजिक्य रहाणे याने ३९ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. गोपालच्या चेंडूवर अ‍ॅँडरसनकरवी अजिंक्य झेलबाद झाला. मात्र, तोपर्यंत राजस्थानने विजयाचा मार्ग सोपा केला होता. एका बाजूने खंबीरपणे उभ्या असलेल्या स्मिथने हुडासोबतही विजयाचा पाया रचला. हुडा मलिंगाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. मात्र, त्याचे दोन षटकार राजस्थानसाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्याने ४ चेडूंत १३ धावा केल्या. अखेर स्मिथने फॉल्कनरसोबत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने अवघ्या २७ चेंडंूत ५० धावा ठोकल्या. मुंबईकडून विनयकुमार, मलिंगा व गोपाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी, कोरी अँडरसन (५०) आणि केरॉन पोलार्ड (७०) यांनी केलेल्या शतकी भागीदारच्या जोरावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सला ५ बाद १६४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पार्थिव पटेल व अ‍ॅरोन फिंच यांनी मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात केली. दोघांनी २१ चेंडूंत २४ धावांची सलामी दिली असताना एकेरी धाव घेत असताना क्षेत्ररक्षकाचा थ्रो फिंचच्या पायावर लागल्याने तो निवृत्त झाला. फिंच त्या वेळी १० धावांवर खेळत होता. यानंतर मात्र मुंबईला गळती लागली. सलामीवीर पार्थिव पटेल (१६) धवल कुलकर्णीच्या चेंडूवर मॉरिसकडे झेल देऊन परतला. कर्णधार रोहित शर्माने याही सामन्यात निराशा केली. तो सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर स्लीपमधील स्मिथला सोपा झेल देऊन तो परतला. मुंबई संघाकडून पहिल्यांदा संधी मिळालेला उन्मुक्त चंद (१२) फारशी चमक दाखवू शकला नाही, प्रवीण तांबेच्या यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडविला.
दहाव्या षटकापर्यंत ३ बाद ४५ अशी संकटमय स्थिती झाली असताना कोरी अँडरसन आणि केरॉन पोलार्ड यांची मैदानावर जोडी जमली. दोघांनी मग राजस्थानी मेजवानीचा समाचार घेतला. यात विशेषत: पोलार्ड आघाडीवर होता. पोलार्डने ताकदीच्या जोरावर चौकार-षटकारांची बरसात करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राजस्थानच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब म्हणजे अँडरसन २३ धावांवर असताना झेलबाद झाला होता; परंतु धवलचा हा चेंडू नोबॉल ठरल्याने त्याला जीवदान मिळाले. पोलार्डने २८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याचा घणाघात सुरूच राहिला. अँडरसनसोबत त्याने चौथ्या विकेटसाठी ५४ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. पोलार्डचा हा झंझावात १९व्या षटकात साउदीने संपुष्टात आणला. करुण नायरकडे झेल देऊन पोलार्ड परतला. त्याने ३४ चेेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या साह्याने ७० धावा केल्या. अँडरसन आणि पोलार्ड
यांनी ५५ चेंडूत १०४ धावांची
भागीदारी केली. शेवटच्या षटकांत अ‍ॅडरसनने मॉरिसला लाँगआॅनवर जोरदार षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले; पण पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.(वृत्तसंस्था)

मुंबई इंडियन्स : अ‍ॅरॉन फिंच जखमी निवृत्त १०, पार्थिव पटेल झे. मॉरिस गो. कुलकर्णी १६, उन्मुक्त चंद त्रि. गो. तांबे १२, रोहित शर्मा झे. स्मिथ गो. बिन्नी ०, कोरी अ‍ॅँडरसन त्रि. गो. मॉरिस ५०; किरॉन पोलार्ड झे. नायर गो. साऊदी ७०, जगदीश सुचित नाबाद ०, श्रेयस गोपाल नाबाद १; अवांतर : ५; एकूण : ५ बाद १६४; गोलंदाजी : टीम साऊदी ४-०-४६-१, ख्रिस मॉरिस ४-०-३४-१, धवल कुलकर्णी ३-०-१५-१, स्टुअर्ट बिन्नी २-०-८-१, दीपक हुडा १-०-३-०, जेम्स फॉल्कनर ३-१-२९-०, प्रवीण तांबे ३-०-२५-१.
राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे झे. अ‍ॅँडरसन गो. गोपाल ४६, संजू सॅमसन झे. शर्मा गो. विनय कुमार १७, स्टीव्ह स्मिथ नाबाद ७९, दीपक हुडा त्रि. गो. मलिंगा १३, जेपी फॉल्कनर नाबाद ६; अवांतर : ४; एकूण : १९.१ षटकांत १६५; गोलंदाजी : विनय कुमार ३-०-१३-१, पवन सुयाल ४-०-४५-०, लसिथ मलिंगा ४-०-४१-१, जगदीश सुचित ४-०-३१-०, कोरी अ‍ॅँडरसन २-०-१२-०, श्रेयस गोपाल २.१-०-२३-१

Web Title: Mumbai defeat hat-trick!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.