मुंबईचा डेम्पो विरुध्द पराभव
By admin | Published: April 12, 2015 02:16 AM2015-04-12T02:16:47+5:302015-04-12T02:16:47+5:30
मुंबई एफसीला डेम्पो एससीकडून ०-१ ने पराभवासह आयलीग फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले़
मुंबई : मुंबई एफसीला डेम्पो एससीकडून ०-१ ने पराभवासह आयलीग फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले़ या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल कार्लोस हर्नांडेजने पेनल्टीवरून केला़ या पराभवामुळे मुंबईची एका स्थानाने घसरण झाली असून मुंबई १३ गुणांसह आठव्या स्थानी आहे. तर डेम्पोने यंदाच्या सत्रातील केवळ दुसरा विजय मिळवताना १३ गुणांसह दहाव्या स्थानावरुन सातव्या स्थानी झेप घेतली.
चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान मुंबईला सामन्यातील अखेरच्या क्षणी केलेली चूक महागात पडली. पहिल्या सत्रात डेम्पोने अपेक्षेप्रमाणे आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. लेनी रॉड्रीग्स, स्ट्रायकर कार्लोस हर्नांडेस, मध्यरक्षक हरुन फकरुद्दिन आणि जॉय फेरारो या अव्वल खेळाडूंनी तुफान आक्रमण करताना गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करताना मुंबईला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईने आक्रमण रोखताना पहिल्या सत्रात सामन्यात गोलशून्य बरोबरी साधली.
यानंतर मात्र मुंबई एफसीने जबरदस्त खेळ करताना पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. डेम्पोच्या आक्रमणाला आक्रमणानेचे उत्तर देताना मुंबईने गोल आक्रमक चाली रचण्याचा सपाटा लावला. मात्र डेम्पोचे भक्कम संरक्षण भेदण्यात अपयश आल्याने मुंबईला गोल करता आला नाही. यानंतर दोन्ही संघानी अखेरपर्यंत झुंजार खेळ करीत सामना रंगतदार केला.
निर्धारीत वेळेनंतर अतिरीक्त वेळेत खेळविण्यात आलेल्या खेळामध्ये खरे नाट्य घडले. मुंबईने हर्नांडेजविरुद्ध गोलक्षेत्रात फाऊल केल्याने डेम्पोला पेनल्टी कीक बहाल करण्यात आली. या सुवर्णसंधीचा फायदा उचलताना हर्नांडेजने निर्णायक विजयी गोल केला. (क्रीडा प्रतिनिधी)