मुंबई ‘फायनल’मध्ये
By admin | Published: May 20, 2015 01:37 AM2015-05-20T01:37:04+5:302015-05-20T01:37:04+5:30
मुंबई इंडियन्सने आयपीएल-८ च्या क्वालिफायर सामन्यत तगड्या चेन्नई सुपर किंग्जला २५ धावांनी लोळवून थेट अंतिम फेरीत धडक मारली.
चेन्नई २५ धावांनी पराभूत : सिमन्स, पोलार्डची फटकेबाजी; हरभजन, मलिंगा, विनयची भेदक गोलंदाजी
रोहित नाईक ल्ल मुंबई
फलंदाजांच्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल-८ च्या क्वालिफायर सामन्यत तगड्या चेन्नई सुपर किंग्जला २५ धावांनी लोळवून थेट अंतिम फेरीत धडक मारली. या धमाकेदार विजयासहितच मुंबईने गतस्पर्धेत एलिमिनेटर सामन्यात चेन्नईविरुद्ध झालेल्या पराभवाचे व्याजासह परतफेडदेखील केली.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार सामन्यात मुंबईने सर्व क्षेत्रांत वरचढ ठरताना चेन्नईचा धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करून २० षटकांत १८७ धावा उभारल्यानंतर मुंबईने चेन्नईला १९ षटकांत १६२ धावांत गुंडाळून दिमाखदार विजय मिळवला. पुन्हा एकदा लसिथ मलिंगाने २३ धावांत ३ फलंदाज बाद करताना निर्णायक कामगिरी केली. विनयकुमार व हरभजन सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का देत मलिंगाने धोकादायक ड्वेन स्मिथला पायचीत पकडले. माईक हसी (१६) देखील फारसी चमक न दाखवता परतल्याने चेन्नईची २ बाद ४६ अशी अवस्था झाली होती. या वेळी फाफ फू प्लेसिस व सुरेश रैना यांनी चेन्नईला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भज्जीने रैनाला (२५) बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याच्या जागी आलेल्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पायचीत करून चेन्नईला ४ बाद ८६ असे अडचणीत पकडले. यानंतर मुंबईकरांनी सामन्यावरील पकड कधीच सोडली नाही. ठरावीक अंतराने निर्णायक धक्के देताना मुंबईने चेन्नईचा डाव संपुष्टात आणला. एका बाजूने एकाकी लढणाऱ्या प्लेसिसने चेन्नईकडून सर्वाधिक ३४ चेंडूत ४५ धावा काढल्या. रैना आणि आर. अश्विन (२३) यांनी देखील मोक्याच्या वेळी फटकेबाजी केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८७ अशी मजल मारली. सलामीवीर लैंडल सिमेन्सचे आक्रमक अर्धशतक आणि किरॉन पोलार्डच्या तुफानी टोलेबाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईची पिटाई केली. सिमेन्स आणि पार्थिव यांनी ९० धावांची शानदार सलामी दिली. पार्थिवने ४ चौकार व १ षटकार खेचून ३५ धावा फटकावल्या. तो ड्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. काही वेळाने सिमेन्स देखील बाद झाल्याने मुंबईच्या धावगतीला खीळ बसली. सिमेन्सने ५१ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांचा नजराणा पेश करताना शानदार ६५ धावांची खेळी केली. कर्णधार रोहित (१९) आणि हार्दिक पांड्या (१) लगेच परतल्याने मुंबईचा डाव ४ बाद १३९ असा घसरला. पोलार्डने अवघ्या १७ चेंडूंत १ चौकार व ५ टोलेजंग षटकार ठोकत ४१ धावांचा तडाखा दिल्याने मुंबईने आव्हानात्मक मजल मारली.
धावफलक :
मुंबई इंडियन्स : लैंडल सिमेन्स झे. नेगी गो. जडेजा ६५, पार्थिव पटेल झे. जडेजा गो. ब्रावो ३५, रोहित शर्मा झे. जडेजा गो. ब्रावो १९, किरॉन पोलार्ड झे. रैना गो. ब्रावो ४१, हार्दिक पांड्या झे. जडेजा गो. नेहरा १, अंबाती रायडू झे. रैना गो. शर्मा १०, हरभजन सिंग नाबाद ६, जगदीश सुचिथ नाबाद १. अवांतर - ९. एकूण : २० षटकांत ६ बाद १८७ धावा. गोलंदाजी : आर. अश्विन ३-०-२२-०; आशिष नेहरा ४-०-२८-१; पवन नेगी ४-०-४६-०; रवींद्र जडेजा २-०-१८-१; मोहित शर्मा ३-०-३३-१; ड्वेन ब्रावो ४-०-४०-३.
चेन्नई सुपर किंग्ज : ड्वेन स्मिथ पायचित गो. मलिंगा ०, माईक हसी झे. पटेल गो. विनयकुमार १६, फाफ डू प्लेसिस झे. विनयकुमार गो. सुचिथ ४५, सुरेश रैना झे. व गो. हरभजन सिंग २५, महेंद्रसिंह धोनी पायचित गो. हरभजन ०, ड्वेन ब्रावो धावबाद (मॅक्क्लेनघन/पटेल) २०, रवींद्र जडेजा झे. सुचिथ गो, मॅक्क्लेनघन १९, पवन नेगी झे. उन्मुक्त चंद गो. विनयकुमार ३, आर. अश्विन झे. रायडू गो. मलिंगा २३, मोहित शर्मा नाबाद ३, आशिष नेहरा झे. सिमेन्स गो. मलिंगा ०. अवांतर - ८. एकूण : १९ षटकांत सर्वबाद १६२ धावा; गोलंदाजी : लसिथ मलिंगा ४-०-२३-३; मिचेल मॅक्क्लेनघन ३-०-४६-१; विनयकुमार ३-०-२६-२; हरभजन सिंग ४-०-२६-२; किरॉन पोलार्ड ३-०-२२-०; जगदीश सुचिथ २-०-१८-१.