बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाचे डोळे उघडले!
By admin | Published: April 14, 2017 01:51 AM2017-04-14T01:51:38+5:302017-04-14T01:51:38+5:30
मुंबई इंडियन्सने कात टाकलेली दिसते. ही झकास सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे डोळे उघडलेच शिवाय नितीश राणासारखा नवा स्टार गवसला.
- सुनील गावसकर लिहितात...
मुंबई इंडियन्सने कात टाकलेली दिसते. ही झकास सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे डोळे उघडलेच शिवाय नितीश राणासारखा नवा स्टार गवसला. हरभजनसारख्या अनुभवी गोलंदाजाला खेळवून संघाने गोलंदाजीत समतोल साधला आहे. काल हैदराबादविरुद्ध हरभजनसोबतच जसप्रीत बुमराहचे यॉर्कर गाजले. मलिंगाने देखील चांगला मारा केला. अन्यथा डावाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळ मुंबईला आणखी एक पराभव देऊन गेला असता.
मुंबईचा सामना आता आरसीबीविरुद्ध आहे. प्रतिस्पर्धी संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केल्यास तो खरोखरच फिट आहे का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या लढतीदरम्यान हरभजन, मलिंगा आणि बुमराहविरुद्ध ख्रिस गेल, डिव्हिलियर्स आणि विराट असे द्वंद्व रंगणार! चाहत्यांसाठी हे विलोभनीय दृश्य असेल तर मार्केटिंगसाठीही चेंडूविरुद्ध बॅट हे चित्र भव्य असेच राहील.
आरसीबीच्या गोलंदाजीत बऱ्याच समस्या आहेत. गेल, डिव्हिलियर्स आणि कोहलीसारखे खेळाडू असल्यानंतरही हा संघ विरोधी संघांवर वचक ठेवण्यात अपयशी ठरताना दिसतो. २०० धावा फळ्यावर लावल्याशिवाय आरसीबीला बचाव करण्यात अडथळा येतो. त्यामुळेच त्यांचे अनेक विजय धावांचा पाठलाग करून साकार झालेले दिसतात.
आजचा दुसरा सामनादेखील फारच प्रेक्षणीय असेल. मागच्या सत्रात तिसऱ्या स्थानी राहिलेला गुजरात संघ अद्याप ‘क्लिक’ झालेला नाही. या संघाला फलंदाजीसोबतच गोलंदाजीच्या समस्येने ग्रासले आहे. दुसरीकडे पुण्याला फॉर्ममध्ये असलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथचा मोठा आधार आहे. गुजरातविरुद्ध तो मैदानात असेल. तो धावा काढत असल्याने धावसंख्येला आकार मिळत आहे. सुरुवातीचे सामने सुरू असले तरी अनेक संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. स्पर्धा जसजसी पुढे सरकेल तसतसे दडपण वाढेल. संघ देखील फलंदाजी-गोलंदाजीचे संतुलन साधण्यावर भर देतील. बाद फेरीत नाणेफेकीचा कौलही निर्णायक ठरणार आहे कारण जिंकणारा कर्णधार आधी क्षेत्ररक्षण करण्याचाच प्रयत्न करणार आहे. (पीएमजी)