मुंबई कबड्डी : जय दत्तगुरु क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:53 PM2019-11-18T22:53:06+5:302019-11-18T22:53:12+5:30
जय दत्तगुरु मंडळाने मध्यांतरातील १४-१६ अशा २ गुणांच्या पिछाडीवरून श्री साई क्रीडा मंडळाचे आव्हान ३२-३१ असे मोडीत काढत उपांत्य फेरी गाठली.
जय दत्तगुरु क्रीडा मंडळ, महागाव तरुण सेवा मंडळ, ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळ, सक्षम क्रीडा मंडळ यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो.आयोजित “ जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमार गटात उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्यांदा पावसामुळे सामने रद्द लागले. आता मैदान उपलब्ध न झाल्यामुळे उर्वरित सामने हे १० डिसेंबर २०१९ पासून खेळविण्यात येतील. वडाळा – मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणात सुरू असलेल्या कुमारांच्या उपांत्यपूर्व सामन्यात जय दत्तगुरु मंडळाने मध्यांतरातील १४-१६ अशा २ गुणांच्या पिछाडीवरून श्री साई क्रीडा मंडळाचे आव्हान ३२-३१ असे मोडीत काढत उपांत्य फेरी गाठली. दीपेश चव्हाण, रुपेश बागल यांच्या धारदार चढाया त्याला साईल सारंगची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे त्यांनी या विजयाला गवसणी घातली. स्वप्नील पवार, पराग जागली यांनी श्री साई क्रीडा मंडळाला विजयी करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले, पण ते त्यांना जमले नाही. महागाव तरुण मंडळाने जय भारत सेवा मंडळ या बलाढ्य संघाचा प्रतिकार ५२-२९ असा संपविला. स्वप्नील खदाले,सतीश रोडे यांच्या धारदार चढाया आणि सिद्धेश येसणे याच्या पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय भारतच्या महंत साळकर, चेतन परब यांचा खेळ संघाला विजयी करण्यास कमी पडला.
ओम पिंपळेश्वरने अमर संदेशाचा ४३-१४ असा धुव्वा उडवीत आपली विजयी दौड सुरूच ठेवली. चेतन गावकर, गणेश गुप्ता यांच्या चढाया, तर संदेश गुडेकर यांच्या पकडी या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. अमर संदेशाचा अभिषेक पाल चमकला. शेवटच्या सामन्यात सक्षम क्रीडा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाचा ३२-२० असा पाडाव केला. सुबोध माने, सुरेंद्र शेंडकर, संदेश गुडेकर सक्षमकडून, तर अनिकेत वाघमोडे, रामचंद्र साळुंखे आकांक्षाकडून उत्तम खेळले. आता उर्वरित सामने १०डिसेंबर पासून पुन्हा सुरू होतील.