मुंबई शहर कबड्डी स्पर्धा : श्री गणेश, लालबाग स्पोर्ट्स यांची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 09:15 PM2019-11-17T21:15:56+5:302019-11-17T21:16:52+5:30
दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार २८-२६ असा मोडून काढला.
जय भारत क्रीडा मंडळ, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, श्री गणेश क्लब, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वर क्रीडा मंडळ, नवोदित संघ यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमार गटात तिसरी फेरी गाठली. वडाळा – मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार २८-२६ असा मोडून काढला. साहिल राणे, दिशांत डांगे यांची आक्रमक चढाया त्याला रोहित कदम यांने दिलेली पकडीची उत्तम साथ यांच्या जोरावर बालवीरने पहिल्या डावात १७-०९ अशी भक्कम आघाडी मिळविण्यात यश मिळविले होते. पण दुसऱ्या डावात ही आघाडी राखण्यात व संघाला विजयी त्यांना अपयश आले. दुसऱ्या डावात जय भारतच्या निखिल पाटील, रोहन पाटील यांनीं धारदार आक्रमण करीत बालवीरचा बचाव खिळखिळा करीत भराभर गुण वसूल केले. शुभम मटकरने धाडशी पकडी करीत त्यांना छान साथ दिल्यामुळेच जय भारताने हा अशक्य वाटणाऱ्या विजयाला गवसणी घातली.
साऊथ कॅनरा स्पोर्ट्सने सिद्धीप्रभाला २९-२७ असे चकवित तिसरी फेरी गाठली. गणेश सिंग, अमन शेख यांच्या दमदार चढाया त्याला नितीन मंडलची मिळालेली पकडीची बहुमोल साथ याच्या जोरावर साऊथ कॅनराने विश्रांतीलाच १४-०५अशी आश्वासक आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात सिद्धिप्रभाच्या ऋतुराज साळुंखे, ओमकार ढवळे यांना बऱ्यापैकी सूर सापडला. पण वेळेचे गणित त्यांना साधता न आल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. श्री गणेश स्पोर्ट्स क्लबने सुनील स्पोर्ट्स क्लबला २९-२७ अशा २ गुणांच्या फरकाने नमवित आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या सामन्यात विश्रांतीला १२-११ अशी नाममात्र आघाडी श्री गणेशकडे होती. हीच आघाडी कायम राखत गणेशने हा विजय साकारला. अमेय बिरमोळे, अजित कडपात श्री गणेशकडून, तर सुनीलकडून आयुष्य सणस, सुहास डोंगरे सुनीलकडून उत्तम खेळले.
लालबाग स्पोर्ट्स क्लबने विश्रांतीतील १८-१२ अशा आघाडी नंतर शेवटी जय ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाचा ३१-२४ असा पाडाव केला. विशाल पाठक, किरण जाधव या विजयाचे शिल्पकार ठरले. अमित कळंबे, सौरभ डिके पराभूत संघाकडून छान खेळले. जय खापरेश्वर क्रीडा मंडळाने अमर संदेशला ४०-२८ असे नमविलें ते राज येरंडे, विश्वजित जाधव, सुजल शिंदे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. अमर संदेशचे विवेक करगुटकर, मृणाल गुरव चमकले. नवोदित संघाने सक्षम क्रीडा मंडळाचा ४४-३० असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली. अजेय शिंदे, प्रणय राणे, मृगेद लाड यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सक्षम कडून शुभम पवार, अनिकेत परमार यांनी बऱ्यापैकी लढत दिली.
कुमार गटाचे इतर निकाल संक्षिप्त :- १)सम्राट क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध अष्टविनायक क्रीडा मंडळ (५०-२९); २) न्यू बर्डस स्पोर्ट्स वि वि अमर क्रीडा मंडळ (४७-२६); ३)विहंग क्रीडा मंडळ वि वि शिवमुद्रा प्रतिष्ठान (५१-२५); ४)खडा हनुमान सेवा मंडळ वि वि सूर्यकांत व्यायाम मंडळ (३८-२२).