मुंबईने लाँच केले ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र
By admin | Published: December 29, 2016 01:19 AM2016-12-29T01:19:47+5:302016-12-29T01:19:47+5:30
नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली
मुंबई : नुकताच झालेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर आणि युवा मुंबईकर पृथ्वी शॉची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे. आगामी १ जानेवारीपासून राजकोट येथे खेळविण्यात येणाऱ्या रणजी उपांत्य सामन्यात पृथ्वीचा १५ सदस्यीय मुंबई संघात समावेश असेल. २०१३ साली शालेय क्रिकेटमध्ये ५४६ धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा भारतीय फलंदाज म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते.
सध्या मुंबईला सलामीवीरांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच हा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या फॉर्ममध्ये असलेल्या १७ वर्षीय पृथ्वीची निवड करण्यात आली आहे. मुंबईचा नियमित सलामीवीर अखिल हेरवाडकर दुखापग्रस्त आहे. तर, संधी देण्यात आलेले इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांनी पृथ्वीवर भरवसा दाखवला आहे.
विशेष म्हणजे, पृथ्वीबाबत आम्ही १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्याचे एमसीए निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रेगे यांनी सांगितले की, ‘सध्या आम्हाला सलामीवीरांच्या अपयशाला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये पृथ्वीने सातत्याने धावा काढल्या असून त्याची कामगिरी लक्षवेधी आहे. नुकताच झालेल्या आशिया चषकमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.’ रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे दोघेही अद्याप आपल्या दुखापतीतून सावरले नसल्याने ते या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. ( क्रीडा प्रतिनिधी)
शालेय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या हॅरिश शिल्ड स्पर्धेत पृथ्वीने २०१३ साली ३३० चेंडूत ५४६ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यावेळी सर्वप्रथम प्रसारमाध्यमांसमोर आला. रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने त्या खेळीत ८५ चौकार व ५ षटकारांचा तडाखा दिला होता. शालेय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारणारा भारतीय म्हणून पृथ्वीने लक्ष वेधले होते. गेल्याच वर्षी कल्याणच्या प्रणव धनावडेने एकाच डावात हजार धावा काढून पृथ्वीला मागे टाकले होते.
‘पृथ्वीबाबत आम्ही राहुल द्रविड सोबतही चर्चा केली. राहुलने त्याच्या खेळीबाबत कौतुक करताना आमच्यावरील भार कमी केला. खुद्द राहुलकडून शाश्वती मिळाल्यानंतर आम्ही फारसा विचार न करता सर्वानुमते पृथ्वीची संघात निवड केली. शिवाय तो सुरुवातीपासून सलामीवीर म्हणून खेळत आहे. तसेच, आशिया चषक स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर तो नक्कीच अपेक्षित कामगिरी असा विश्वास आहे,’ असेही रेगेंनी सांगितले.
मुंबई संघ :
आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, श्रेयश अय्यर, सुर्यकांत यादव, सिध्देश लाड, प्रफुल वाघेला, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकुर, बलविंदर सिंग संधू (ज्यू.), तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, सुफियान शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप आणि एकनाथ केरकर.
पृथ्वीची मुंबईत संघात निवड होणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. अंडर १९ भारतीय संघाचा अनुभव त्याच्या पाठिशी आहे. कोणत्याही दडपणाशिवाय आपला नैसर्गिक खेळ करण्यचा सल्ला त्याला दिला आहे. तो नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करेल.
- पंकज शॉ, पृथ्वीचे वडील