हैदराबादविरुद्ध मुंबईला आघाडी

By admin | Published: December 26, 2016 01:37 AM2016-12-26T01:37:29+5:302016-12-26T01:37:29+5:30

अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिल यांच्या सुरेख गोलंदाजीच्या कामगिरीच्या बळावर विद्यमान चॅम्पियन मुंबईने

Mumbai lead against Hyderabad | हैदराबादविरुद्ध मुंबईला आघाडी

हैदराबादविरुद्ध मुंबईला आघाडी

Next

रायपूर : अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिल यांच्या सुरेख गोलंदाजीच्या कामगिरीच्या बळावर विद्यमान चॅम्पियन मुंबईने रविवारी हैदराबादचे २५ धावांत ५ फलंदाज तंबूत धाडताना उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या डावात १४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
मुंबईच्या पहिल्या डावातील २९४ धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबाद के. सुमंथ आणि मेहदी हसन खेळत असताना ५ बाद २५५ अशी मजबूत स्थिती होती आणि ते मुंबई संघावर आघाडी घेणार असेच चित्र होते; परंतु गोहिलने मेहदी हसनला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत तंबूत धाडताना कलाटणी दिली. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपली पकड ढिली पडू दिली नाही. मुंबईच्या सुरेख गोलंदाजीसमोर ५ बाद २५५ अशा स्थितीत असणारा हैदराबादचा अर्धा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या १३ षटकांत आणि २५ धावांत गडगडला. हैदराबादने पहिल्या डावात २८0 धावा केल्या.
पहिल्या डावात १४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या मुंबईची दुसऱ्या डावाची सुरुवात सनसनाटी झाली. त्यातून सावरताना मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद १0२ धावा करीत एकूण ११६ धावांची आघाडी घेतली. हैदराबादने आज सकाळी पहिल्या डावातील ३ बाद १६७ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. हैदराबादने कालचा नाबाद फलंदाज तन्मय अग्रवाल (८२) आणि बी. संदीप (१७) यांना लवकर गमावले; परंतु के. सुमंत आणि मेहदी हसन (३२) यांनी सहाव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करताना हैदराबाद संघाची पहिल्या डावात आघाडी घेण्याची आशा उंचावली. गोहिल याने हसनला बाद करीत ही भागीदारी फोडली. त्यानंतर गोहिल याने भंडारी व सिराजला बाद करताना मुंबईच्या मार्गातील मोठे अडथळे दूर केले. सुमंत अखेरच्या फलंदाजाच्या स्वरूपात बाद झाला. मुंबईकडून अभिषेक नायरने ६0 धावांत ४ गडी बाद केले. विजय गोहिलने ५९ धावांत ३, तर शार्दूल ठाकूरने ४५ धावांत २ बळी घेत अभिषेकला साथ दिली.
दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात ढिसाळ झाली. सी. व्ही. मिलिंदने सलामीवीर केव्हिन अलमिडा (१) याला त्रिफळाबाद करीत मुंबईला पहिला जोरदार धक्का दिला. त्यानंतर मोहंमद सिराजने श्रेयस अय्यर (१२) आणि सूर्यकुमार यादव (३) यांना तंबूत धाडल्यामुळे मुंबईची स्थिती ३ बाद ५२ अशी झाली; परंतु कर्णधार आदित्य तारे सलामीवीर प्रफुल्ल वाघेला (नाबाद २७) यांनी मुंबईचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी नाबाद ५0 धावांची भागीदारी केली.

विराट सिंहचे शतक, झारखंडला आघाडी
वडोदरा : युवा फलंदाज विराट सिंहच्या कारकीर्दीतील दुसऱ्या शतकी खेळीच्या बळावर झारखंडने रविवारी पहिल्या डावात ८७ धावांची आघाडी घेतली; परंतु हरियाणाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करताना रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
१९ वर्षीय विराटने सकाळी ८१ धावांवरून पुढे खेळताना १0७ धावांची खेळी केली. तळातील फलंदाज शाहबाज नदीम (३४) व राहुल शुक्ला यांनीही उपयुक्त योगदान दिले. झारखंडने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या.
पहिल्या डावात २५८ धावा करणाऱ्या हरियाणाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद १४२ धावा केल्या आणि ५९ धावांची आघाडी घेतली.
नितीन सैनी (४१) आणि शुभम् रोहिल्ला (४३) यांनी सलामीसाठी ७९ धावांची भागीदारी केली. या दोघांना समर कादरीने १२ धावांच्या आत तंबूत धाडले. त्यानंतर चैतन्य बिश्नोई (नाबाद ३३) आणि शिवम चौहान (नाबाद २२) यांनी पडझड होऊ दिली नाही. (वृत्तसंस्था) 


गोहेलच्या शतकाने गुजरातची पकड
 जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीनंतर समित गोहेलच्या शतकी खेळीच्या बळावर गुजरातने रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या दिवशी येथे ओडिशाविरुद्ध ३१0 धावा करीत पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी घेत आपली स्थिती भक्कम केली.
 कालच्या ८ बाद १८४ या धावसंख्येवरून पुढे खेळणारा ओडिशाचा संघ १५ धावांची भर घालून १९९ धावांत सर्वबाद झाला. बसंत मोहंती (१२) आणि धीरज सिंह (0) यांच्या रूपाने ओडिशाने त्यांचे अखेरचे २ फलंदाज गमावले. दीपक बेहडा ४१ धावांवर नाबाद राहिला. गुजरातने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. गुजरातकडून बुमराहने ४१ धावांत ५ गडी बाद केले. रुष कलारिया व हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
 पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी घेणाऱ्या गुजरातने गोहेल (नाबाद ११0) आणि प्रियांक पांचाल (८१) यांनी सलामीसाठी केलेल्या १४९ धावांच्या भागीदारीच्या बळावर गुजरातने दिवसअखेर ३ बाद २६४ धावा करीत आपली स्थिती भक्कम केली.
पांचालने ११६ चेंडूंत १४ चौकार मारले, तर प्रथमश्रेणीत तिसरे शतक पूर्ण करणाऱ्या गोहेलने २९१ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार मारले. 

Web Title: Mumbai lead against Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.