मुंबई महानगरपालिकेला विजेतेपद
By admin | Published: February 3, 2015 01:56 AM2015-02-03T01:56:37+5:302015-02-03T01:56:37+5:30
कर्णधार संदेश परळकरच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या संघाने टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जी डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले.
मुंबई : कर्णधार संदेश परळकरच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या संघाने टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जी डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी ओमनी मरिन्स संघावर ९४ धावांनी विजय मिळवला. विजेत्यांना दीड लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
पालिकेचा कर्णधार परळकरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर म्हणून आलेल्या परळकरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ४४ चेंडूंत १२ चौकारांसह ६४ धावा चोपल्या. त्याने प्रथम पाटेकरसह (१६) ६४ धावांची, तर मिलिंद आरेकरसह (३६) ४७ धावांची भागीदारी केली. परळकर बाद झाल्यानंतर मिलिंदने रुपेश नाईकसह (१५) आणखी ३१ धावांची भर टाकल्याने पालिकेने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६६ धावांचे लक्ष्य उभारले. लक्ष्याचा पाठलाग करताना ओमनी मरिन्स संघाचा एकही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. संतोष धांडे (३-१०) आणि प्रकाश सोलंकी (२-२२) या जोडीने मरिन्स संघाच्या फलंदाजांना झटपट तंबूत धाडले. प्रज्वल नाईक (२-८) यानेही त्यांना साथ दिली. त्यामुळे मरिन्स संघाचा डाव १७ षटकांत अवघ्या ७२ धावांवर गडगडला. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक : मुंबई महानगरपालिका : ५ बाद १६६ धावा (संदेश परळकर ६४, मिलिंद आरेकर ३६; सचिन चौधरी २-२९) वि. वि. ओमनी मरिन्स : १७ षटकांत ७२ धावा (निखिल कोटियन १५; संतोष धांडे ३-१०, प्रकाश सोळंकी २-२२, प्रज्वल नाईक २-८)