मुुंंबई - पुणे सायकल शर्यत रंगणार
By Admin | Published: March 26, 2016 02:20 AM2016-03-26T02:20:43+5:302016-03-26T02:20:43+5:30
देशभरात नावाजलेल्या आणि खडतर मानल्या जाणाऱ्या ५१व्या मुंबई-पुणे राष्ट्रीय अजिंक्यपद सायकल शर्यतीचा थरार २७ मार्चला रंगणार आहे. सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने
मुंबई : देशभरात नावाजलेल्या आणि खडतर मानल्या जाणाऱ्या ५१व्या मुंबई-पुणे राष्ट्रीय अजिंक्यपद सायकल शर्यतीचा थरार २७ मार्चला रंगणार आहे. सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने होत असलेल्या या शर्यतीला मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथून हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.
यंदा ही शर्यत मुंबई ते खंडाळा आणि खंडाळा ते पुणे अशा दोन टप्प्यांत होणार आहे. या दोन टप्प्यांमध्ये ३० मिनिटांचा अवधी असेल. पुण्यामध्ये येताना स्पर्धक एकटे येत असल्यामुळे प्रेक्षकांसाठी स्पर्धा कंटाळवाणी होते. त्यामुळे यंदा हा बदल केल्याचे आयोजकांनी सांगितले. पुणे येथे अंतिम रेषा पार करणाऱ्या प्रथम १६ स्पर्धकांना
रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाय पनवेल, खोपोली, बोर घाट या टप्प्यावर विजयी सायकलपटूंचादेखील सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अत्यंत खडतर बोर घाट प्रथम पार करणाऱ्या सायकलपटूस ‘घाटाचा राजा’ या किताबासह रोख ३१ हजार रुपयांच्या बक्षिसाने गौरविण्यात येईल. तसेच या ठिकाणी येणाऱ्या पहिल्या ११ सायकलपटूंनाही रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे बोर घाटात पहिल्या येणाऱ्या सायकलपटूनंतर १५ मिनिटांत पोहोचणारे सर्व सायकलपटू स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे यंदा मोठी चुरस दिसून येईल. खंडाळा - पुणे हा दुसरा टप्पा येथून ३० मिनिटांनी सुरू होईल. (क्रीडा प्रतिनिधी)
आतापर्यंत स्पर्धेत देशभरातील ७८ सायकलपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक, मध्य रेल्वे, दक्षिण - मध्य रेल्वे, सेना दल, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वोत्तम सायकलपटूंचा सहभाग आहे.