आयपीएलसाठी मुंबई सज्ज -रोहित शर्मा
By Admin | Published: April 6, 2015 03:03 AM2015-04-06T03:03:42+5:302015-04-06T03:03:42+5:30
आमचा संघ पूर्णपणे समतोल असून यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्यासाठी आम्ही पुर्णपणे सज्ज आहोत, असे सांगून मुंबई इंडियन्सचा कर्णधार
मुंबई : आमचा संघ पूर्णपणे समतोल असून यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्यासाठी आम्ही पुर्णपणे सज्ज आहोत, असे सांगून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएल आठव्या सत्रासाठी रणशिंग फुंकले आहे. त्याचवेळी विश्वचषक कायम राखण्यात आलेले अपयश निराशाजनक असले तरी आता आमच्यासमोर आयपीएलच्या रूपाने नवे आव्हान उभे असल्याचे देखील रोहितने यावेळी सांगितले.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचे नवे प्रशिक्षक रिकी पाँटिंग उपस्थित होते. या वेळी रोहितने सांगितले की, आम्ही युवा खेळाडूंवर अधिक भर दिला आहे. प्रशिक्षक पाँटिंग स्वत: दोन वेळचे विश्वविजेते कर्णधार असल्याने त्यांना मोठ्या स्पर्धेतील यशस्वी कामगिरीचा अनुभव आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा होईल.
तसेच आयपीएलच्या माध्यमातून जगभरातील अव्वल खेळाडूंसोबत किंवा त्यांच्या विरोधात खेळण्याची संधी मिळते. यामुळे नवोदितांना शिकण्यासाठी खूप मिळते, असेही रोहित म्हणाला. गेल्या चार महिन्यांपासून भारतीय खेळाडू आॅस्टे्रलियामध्ये होते आणि त्यानंतर आता थेट आयपीएल खेळणार असून याबाबत रोहित म्हणाला की, आॅस्टे्रलिया दौऱ्यापासूनच आम्हाला आयपीएल सत्राची माहिती होती. त्यामुळे सगळेच मानसिकरीत्या तयार होते. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्याविषयी रोहितने म्हणाला की, केकेआरची गोलंदाजी उत्तम असून ते गतविजेते आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. शिवाय विजयी सुरुवात करणे आवश्यक असल्याने दोन्ही संघांवर दडपण असेल. इडन गार्डन स्टेडियमवरच आम्ही २०१३ साली पहिल्यांदा विजेतेपद उंचावले होते.
आयपीएलमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या रिकी पाँटिंगने सांगितले की, केकेआर विरुद्धच्या सामन्यासाठी आमच्याकडे दोन दिवसांचा अवधी असून, या काळामध्ये प्रत्येक खेळाडू स्वत:ला तेथील परिस्थितीशी जुळवून घेईल. गेला आठवडाभर आम्ही कसून सराव केला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)