मुंबईची बंगालविरुद्ध पकड घट्ट

By admin | Published: December 30, 2014 02:17 AM2014-12-30T02:17:36+5:302014-12-30T02:17:36+5:30

भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर यजमान पश्चिम बंगालची ६ बाद १३० अशी अवस्था करीत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मुंबईकडे अजून २८४ धावांची आघाडी आहे.

Mumbai take a tough fight against Bengal | मुंबईची बंगालविरुद्ध पकड घट्ट

मुंबईची बंगालविरुद्ध पकड घट्ट

Next

कोलकाता : फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या डावात ४१४ धवांची मजल मारल्यानंतर शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर यजमान पश्चिम बंगालची ६ बाद १३० अशी अवस्था करीत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मुंबईकडे अजून २८४ धावांची आघाडी आहे.
कोलकाता येथील इडन गार्डन येथे सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयश अय्यरच्या शानदार दीड शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४१४ धावा फटकावल्या. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बंगालची फलंदाजी मुंबईकरांच्या आणि खासकरून शार्दुल ठाकूरच्या माऱ्यापुढे कोलमडली. शार्दुलने सुरुवातीपासूनच टिच्चून मारा करताना केवळ ३७ धावा देताना ५ फलंदाजांना माघारी पाठवत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
बंगालच्या डावातील पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शार्दुलने अरिंदम दासला बाद करताना यजमानांना पहिला धक्का दिला. पुढच्याच षटकात विल्कीन मोटाने नुकत्याच फलंदाजीला आलेल्या सुदीप चॅटर्जीला पायचित पकडत बंगालची अवस्था २ बाद १० धावा अशी केली. यानंतर रोहन बॅनर्जीने अनुभवी मनोज तिवारीसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा शार्दुलने अचूक मारा करीत बॅनर्जीला माघारी धाडले. यानंतर लगेच फलंदाजीला आलेल्या श्रीवत्स गोस्वामीला शार्दुलने आल्यापावली माघारी पाठवताना बंगालला अडचणीत आणले.
जम बसलेला मनोज तिवारीदेखील काहीसा दडपणाखाली आला आणि याचा अचूक फायदा उचलताना शार्दुलने जबरदस्त मारा करीत तिवारी आणि कर्णधार लक्ष्मी रतन शुक्ला यांना चकवत बंगालची अवस्था ६ बाद १०९ अशी केविलवाणी करीत मुंबईला मजबूत वर्चस्व मिळवून दिले. भरवशाच्या मनोज तिवारीने यजमानांकडून एकाकी झुंज देताना
७८ चेंडूंत १० चौकारांच्या साहाय्याने ६३ धावा काढल्या. मुंबईकडून शार्दुलने यशस्वी मारा करताना एकट्याने बंगालचा अर्धा संघ माघारी पाठवला. तसेच विल्कीन मोटाने त्याला चांगली साथ देताना एक गडी बाद करण्यात यश मिळवले.
बंगाल अजूनही २८४ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे ४ फलंदाज बाकी आहेत.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी ४ बाद ३०६ धावांवरून सुरुवात करताना मुंबईचा डाव ४१४ धावांवर आटोपला. कर्णधार सूर्यकुमार यादव लवकर बाद झाल्यानंतर सिद्धेश लाड याने संयमी खेळ करताना १०० चेंडूंत १० चौकारांच्या साहाय्याने ६४ धावा फटकावून आपली निवड सार्थ केली. मात्र सिद्धेश बाद झाल्यानंतर शेवटची फळी जास्त वेळ तग धरू न शकल्याने मुंबईची धावसंख्या मर्यादित राहिली. (वृत्तसंस्था)

मुंबई
(पहिला डाव)
तरे झे. गोस्वामी गो. प्रताप सिंग २४, हेरवाडकर झे. चॅटर्जी गो. शुक्ला २५, अय्यर झे. गोस्वामी गो. दिंडा १५३, नायर पायचित गो. प्रताप सिंग ६५; यादव झे. गोस्वामी गो. चक्रवर्ती ३६, लाड झे. गोस्वामी गो. चक्रवर्ती ६४; सर्फराझ खान पायचित गो. दिंडा १; मोटा झे. गोस्वामी गो. ४; ठाकूर त्रि. गो. २; अब्दुल्ला त्रि. गो. प्रताप सिंग, वायंगणकर नाबाद १३. अवांतर २०. एकूण सर्वबाद ४१४ धावा.

प. बंगाल
(पहिला डाव) :
बॅनर्जी झे. अय्यर गो. शार्दुल ७; दास झे. यादव गो. शार्दुल ५; चॅटर्जी पायचित गो. मोटा १; तिवारी झे. तरे गो. शार्दुल ६३; गोस्वामी झे. हेरवाडकर गो. शार्दुल ०; ईश्वरण खेळत आहे ३१; शुक्ला त्रि. गो. शार्दुल ११; एस. बॅनर्जी खेळत आहे १०. अवांतर २. एकूण ६ बाद १३० धावा.

गोलंदाजी
दिंडा : ३५-८-१०७-२; चक्रवर्ती : २६.२-८-८२-२; प्रताप सिंग : २८-५-११४-३; शुक्ला : २१-५-५८-३; बॅनर्जी : ९-१-३२-०; तिवारी : २-०-६-०.

गोलंदाजी
शार्दुल १६-३-३७-५; मोटा १३-२-५४-१; वायंगणकर १३-२-२७-०; अब्दुल्ला २-०-३-०; हेरवाडकर १-०-६-०; यादव १-०-१-०.

Web Title: Mumbai take a tough fight against Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.