तर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा मुंबई ठरणार पहिला संघ
By Admin | Published: May 21, 2017 06:28 PM2017-05-21T18:28:48+5:302017-05-21T18:28:48+5:30
आज होणाऱ्या अंतिम लढतीत विजय मिळवल्यास मुंबई इंडियन्सच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 21 - आयपीएल 10 च्या महाअंतिम लढतीस सुरुवात होण्यास आता काही तासांचाच अवधी उरला आहे. या लढतीसाठी मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे दोन्ही संघ कंबर कसून तयार झाले आहेत. गेल्या दहा वर्षात आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याची मुंबईची ही चौथी वेळ आहे. तर दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या पुणे सुपरजायंट्स संघाने पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. आता आज होणाऱ्या अंतिम लढतीत विजय मिळवल्यास मुंबई इंडियन्सच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने स्पर्धेत 100 विजयांची नोंद करणारा पहिला संघ बनण्याचा मान यावर्षी पटकावला होता. तसेच तीन वेळा अंतिम फेरीत खेळत दोन वेळा विजेतेपदाला गवसणी घालण्याचा मानही मुंबईने मिळवला आहे. आता आज रात्री पुण्याला चितपट करून आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केल्यास तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा मुंबई हा आयपीएलमधील पहिला संघ ठरणार आहे.
याआधी चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले आहे. आता आज विजेतेपद पटकावल्यास चेन्नई आणि कोलकात्याला मागे टाकण्याची संधी मुंबईकडे असेल.