मुंबई विजयी लय राखण्यास प्रयत्नशील
By admin | Published: April 16, 2017 03:37 AM2017-04-16T03:37:54+5:302017-04-16T03:37:54+5:30
मागच्या सामन्यात विपरीत परिस्थितीत विजय नोंदविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला मुंबई गुजरातविरुद्ध आयपीएलमध्ये आज रविवारी विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
मुंबई : मागच्या सामन्यात विपरीत परिस्थितीत विजय नोंदविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला मुंबई गुजरातविरुद्ध आयपीएलमध्ये आज रविवारी विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
गुजरातने पुणे संघावर ७ गड्यांनी विजय साजरा करीत विजयीपथावर पोहोचला. चार सामन्यांत सहा गुण मिळविणाऱ्या मुंबईला आघाडीच्या फलंदाजीची समस्या अद्याप भेडसावते आहे. पोलार्डने तारले नसते तर मुंबईला विजयी लक्ष्य गाठणे अशक्य होते. कर्णधार रोहित शर्मा हा गुगलीपुढे नांगी टाकतो. इम्रान ताहीर, राशिद खान आणि बद्री यांनी त्याला जाळ्यात ओढले आहे. रोहितने तिन्ही सामन्यांत दहापेक्षा कमीच धावा केल्या. मुंबईसाठी सकारात्मक बाब ठरली ती हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंची बहारदार खेळी. सामन्यात दोघांनीही योगदान दिले. आरसीबी तसेच हैदराबादविरुद्ध कृणालने मोक्याच्या क्षणी धावा ठोकल्या होत्या. गोलंदाजीत हरभजनसिंगने अनुुभव सिद्ध केला. मलिंगा गुजरातविरुद्ध यशस्वी ठरल्यास आक्रमण आणखी भक्कम होईल. गुजरात लायन्स ब्रेंडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ यांच्याकडून डावाचा प्रारंभ करू शकतो. कर्णधार सुरेश रैना सातत्याने धावा काढत आहे. अॅरोन फिंच यानेदेखील मोलाचे योगदान दिले. या चौघांच्या उपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. अॅन्ड्र्यू टाय याने हॅट्ट्रिक नोंदविल्याने गुजरातची गोलंदाजी बलाढ्य झाल्याचे चित्र निर्माण झाले. (वृत्तसंस्था)