मुंबईच्या महिलांनी मारली बाजी, राज्य कॅरम स्पर्धेत पुणे संघाला नमवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:25 AM2022-08-16T05:25:43+5:302022-08-16T05:25:59+5:30
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या (एमसीए) वतीने जुन्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार काजल कुमारीने पुण्याच्या मेधा मठकरीला १७-१६, २५-६ असे सहज नमवले.
मुंबई : मुंबईच्या महिला संघाने आपल्या लौकिकानुसार खेळ करत पुणे संघाचे कडवे आव्हान ३-० असे सहज परतावले. यासह मुंबईकरांनी ५६व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत सांघिक महिला गटाचे जेतेपद पटकावताना भास्कर वामन ठाकूर चषक उंचावला.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या (एमसीए) वतीने जुन्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार काजल कुमारीने पुण्याच्या मेधा मठकरीला १७-१६, २५-६ असे सहज नमवले. अंबिका हरिथने पुष्कर्णी भट्टडचा २५-११, २५-१२ असा पराभव केल्यानंतर दुहेरीत अनुपमा केदार-मिताली पाठक यांनी पूजा मेश्राम-श्रुती वेळेकर यांना १५-१९, २५-११, १७-१० असे नमवत मुंबईचे जेतेपद निश्चित केले.
सिंधुदुर्गने ठाण्याला २-१ असे नमवत तिसरे स्थान पटकावले. ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने केशर निर्गुणला १९-१२, २५-६ असे नमवले. यानंतर सिंधुदुर्गने पुनरागमन केले. दीक्षा चव्हाणने चैताली सुवारेला, तर मयुरी गावडे-प्रणिता आयरे यांनी मधुरा देवळे-वीणा चव्हाण यांना नमवत सिंधुदुर्गला विजयी केले.