मध्य प्रदेशच्या फिरकीपुढे मुंबईकरांची घसरगुंडी

By admin | Published: November 24, 2015 02:23 AM2015-11-24T02:23:50+5:302015-11-24T02:23:50+5:30

गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने बलाढ्य मुंबई रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध अडचणीत आला आहे.

Mumbaikars drop out of Madhya Pradesh spree | मध्य प्रदेशच्या फिरकीपुढे मुंबईकरांची घसरगुंडी

मध्य प्रदेशच्या फिरकीपुढे मुंबईकरांची घसरगुंडी

Next

इंदौर : गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने बलाढ्य मुंबई रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध अडचणीत आला आहे. यजमान मध्य प्रदेशला २४० धावांत गुंडाळल्यानंतर पहिल्या दिवसअखेर मुंबईची ६ बाद ७४ अशी केविलवाणी अवस्था झाली. अजूनही मुंबईकर
१६६ धावांनी पिछाडीवर आहेत. निखिल पाटील आणि इक्बाल अब्दुल्ला या नाबाद जोडीवर मुंबईची भिस्त टिकून आहे.
होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र मधल्या फळीतील हरप्रीत सिंगचा अपवाद वगळता त्यांचा इतर कुठलाही फलंदाज मुंबईच्या माऱ्यापुढे टिकू शकला नाही. मध्य प्रदेशला ७५.१ षटकांत २४० धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईच्या एकहाती वर्चस्वाची अपेक्षा होती. मात्र मुंबईकर फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे यजमानांनी पहिल्याच दिवशी नाट्यमयरीत्या सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
जलज सक्सेना आणि अंकित शर्मा या फिरकीपटूंनी मुंबईकरांना आपल्या तालावर नाचवताना प्रत्येकी ३ बळी घेतले. अखिल हेरवाडकर आणि जय बिस्त यांनी सावध सुरुवात केल्यानंतर ३९ धावांवर मुंबईला हेरवाडकरच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर अवघ्या ३० धावांत झटपट ५ फलंदाज बाद झाल्याने मुंबईचा डाव केवळ २१ षटकांत ६ बाद ६९ धावा असा घसरला.
निखिल पाटील आणि इक्बाल अब्दुल्ला या जोडीने दिवसअखेर टिकून राहताना मुंबईची आणखी पडझड रोखली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या मध्य प्रदेशला बसलेल्या झटपट धक्क्यानंतर हरप्रीतने झुंजार ५९ धावांची खेळी करून सावरले. त्याने १५५ चेंडूंत ५ चौकार लगावले. मध्य प्रदेश ४ बाद ६९ अशा अडचणीत असताना हरप्रीतने देवेंद्र बुंदेलासह निर्णायक ६२ धावांची भागीदारी केली. बुंदेला बाद झाल्यानंतर यजमानांचा डाव पुन्हा घसरला. नवव्या क्रमांकावरील ईश्वर पांड्येने आक्रमक ३५ धावा फटकावताना संघाला २०० चा टप्पा पार करून दिला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईकर अंकुश जयस्वालने शानदार कामगिरी करताना ६३ धावांत ४ धक्के देत यजमानांना हादरवले. तर शार्दुल ठाकूर आणि विशाल दाभोळकर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर त्रि. गो. अंकित शर्मा १७, जय बिस्त झे. श्रीवास्तव गो. सक्सेना २७, श्रेयश अय्यर झे. ओझा गो. सक्सेना १, सूर्यकुमार यादव पायचीत गो. सक्सेना २, आदित्य तरे झे. पाटीदार गो. शर्मा ०, सिद्धेश लाड त्रि. गो. शर्मा १३, निखिल पाटील खेळत आहे १०, इक्बाल अब्दुल्ला खेळत आहे ०. अवांतर - ४. एकूण : २१ षटकांत ६ बाद ७४ धावा.
गोलंदाजी : जलज सक्सेना ११-२-३२-३; अंकित शर्मा १०-२-३९-३.
आदित्य श्रीवास्तवा त्रि. गो. ठाकूर ७, जलज सक्सेना पायचीत गो. दाभोळकर १६, रजत पाटीदार झे. अय्यर गो. अब्दुल्ला २६, नमन ओझा झे. हेरवाडकर गो. जयस्वाल १५, हरप्रीत सिंग झे. तरे गो. जयस्वाल ५९, देवेंद्र बुंदेला त्रि. गो. ठाकूर १४, रमीझ खान झे. यादव गो. बिस्त २३, अंकित शर्मा झे. तरे गो. जयस्वाल ९, एस. जैन झे. अय्यर गो. जयस्वाल ०, इश्वर पांड्ये झे. यादव गो. दाभोळकर ३५, मिहिर हिरवाणी नाबाद १७. अवांतर - १९. एकूण : ७५.१ षटकांत सर्व बाद २४० धावा.
गोलंदाजी : शार्दुल ठाकूर १५-४-४२-२; विशाल दाभोळकर १९.१-३-५९-२; इक्बाल अब्दुल्ला १३-३-२९-१; अंकुश जयस्वाल १९-४-६३-४; सिद्धेश लाड ३-०-१२-०; जय बिस्त ६-१-१६-१.

Web Title: Mumbaikars drop out of Madhya Pradesh spree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.