मुंबईकरांनी पाटणाला लोळवले
By admin | Published: February 20, 2016 02:36 AM2016-02-20T02:36:10+5:302016-02-20T02:36:10+5:30
गतविजेत्या यू मुंबाने दणकेबाज खेळाच्या जोरावर आतापर्यंत अपराजित असलेल्या पाटणा पायरेट्सला त्यांच्याच मैदानावर ३४-२८ असे दिमाखात लोळवले
रोहित नाईक, पाटणा
गतविजेत्या यू मुंबाने दणकेबाज खेळाच्या जोरावर आतापर्यंत अपराजित असलेल्या पाटणा पायरेट्सला त्यांच्याच मैदानावर ३४-२८ असे दिमाखात लोळवले. या शानदार विजयासह पाटणाविरुद्ध बंगळुरुला झालेल्या पराभवाची व्याजासहित परतफेड करताना मुंबईकरांनी इतर प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशाराच दिला आहे.
पाटलीपुत्र स्टेडियममध्ये झालेल्या या लक्षवेधी सामन्यात मुंबईकरांनी पहिल्याच मिनिटापासून आक्रमक पवित्रा घेताना आपला इरादा स्पष्ट केला. मुख्य खेळाडूंच्या पुनरागमनाने बलाढ्य झालेल्या मुंबईकरांची एकूणच देहबोली पाहता पाटणाला यंदाच्य मोसमातील पहिला धक्का बसणार हे स्पष्ट होते. जबरदस्त आक्रमकतेने खेळणाऱ्या मुंबईकरांनी पहिल्याच डावात पाटणावर दोन लोण चढवून मध्यंतराला २४-९ अशी १५ गुणांची आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. मध्यंतरानंतर पाटणाने काही प्रमाणात प्रतिकार केला. रोहित कुमारने केलेल्या सुपर रेडच्या जोरावर पाटणााने मुंबईकरांवर लोण चढवून २४-३१ असे पुनरागमन केले. यावेळी पाटणाने झुंजार खेळ करत मुंबईकरांवर दबाव आणण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र दडपणात उत्कृष्ट खेळ करण्यात तरबेज असलेल्या मुंबईकरांनी अखेर बाजी मारलीच. रिशांक देवाडिगा व कर्णधार अनुप कुमार यांच्या खोलवर चढाया व फझेल अत्राचलीच्या दमदार पकडी मुंबईच्या विजयात निर्णयक ठरल्या. तर यजमानांकडून रोहित कुमारने एकाकी अपयशी लढत दिली.
त्याआधी, बलाढ्य वॉरियर्सने सामन्यावरील पकड अखेरपर्यंत कायम राखताना तेलगू टायटन्सला ३२-२८ असे नमवले. १६व्या मिनिटाला तेलगूवर लोण चढवून मध्यंतराला १६-१२ असे वर्चस्व राखलेल्या बंगालला दुसऱ्या सत्रात तेलगू संघाने कडवी झुंज दिली. सुकेश हेगडे व राहूल चौधरी यांच्या चढाया व मेरज शेख, धर्मराज चेरलाथन यांच्या पकडी या जोरावर तेलगूने बरोबरी साधली. मात्र अतिआक्रमकपणा नडल्याने त्यांना आघाडी घेण्यात अपयश आले. ३९व्या मिनिटाला तेलगूवर दुसरा लोण चढवून बंगालने शानदार विजय निश्चित केला.