घरच्या मैदानावर मुंबईचा डंका वाजणार?

By admin | Published: April 11, 2015 11:37 PM2015-04-11T23:37:49+5:302015-04-11T23:37:49+5:30

यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात पराभव पत्करावा लागलेले दोन संघ, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येतील.

Mumbai's dancer playing at home? | घरच्या मैदानावर मुंबईचा डंका वाजणार?

घरच्या मैदानावर मुंबईचा डंका वाजणार?

Next

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात पराभव पत्करावा लागलेले दोन संघ, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येतील. त्यामुळे पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या या दोन संघांतील सामना नक्कीच अटीतटीचा रंगेल. त्यात घरच्या मैदानावर यजमान मुंबई इंडियन्स कायमच वरचढ ठरल्याने अर्थातच या सामन्यात यजमान संभाव्य विजेते असतील. दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघात एकाहून एक धडाकेबाज खेळाडूंचा समावेश असल्याने मुंबईला गाफिल राहणे चांगलेच महागात पडू शकेल.
या सामन्यापूर्वी सराव आणि विश्रांतीसाठी चांगला वेळ मिळाल्याने मुंबईकरांवर थकवा नसेल.
मुंबईच्या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास साहजिकच यजमानांची मदारही मजबूत फलंदाजीवर असेल. सलामीच्या सामन्यात संघ अडचणीत असताना कर्णधार रोहित शर्माने नाबाद ९८ धावा कुटताना मुंबईला आव्हानात्मक मजल मारून दिली होती. त्यामुळे या सामन्यातदेखील कर्णधारावर मोठी जबाबदारी असेल. शिवाय या वेळी धडाकेबाज कोरी अँडरसननेदेखील शर्माची चांगली साथ दिली होती. या दोघांशिवाय अ‍ॅरॉन फिंच, आदित्य तरे आणि अंबाती रायुडू या इतर मुख्य फलंदाजांकडूनसुद्धा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा यजमानाचे मुख्य अस्त्र आहे. सलामीच्या सामन्यात अपयशी ठरलेला मलिंगा एकदा का फॉर्ममध्ये आला तर, भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवू शकतो. त्यामुळे यजमानांना प्रतीक्षा आहे ती मलिंगाच्या फॉर्मची. याशिवाय यंदाच्या रणजी स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज विनयकुमार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग, प्रग्यान ओझा यांच्यावरसुद्धा संघाची मदार असेल. हुकमी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डचा जलवा या वेळी दिसणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसऱ्या बाजूला पाहुण्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या गोलंदाजीची धुरा मिचेल जॉन्सनवर असेल. फलंदाजीमध्ये वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, कर्णधार जॉर्ज बेली आणि मुरली विजय यांच्यावर संघ अवलंबून असेल.
(क्रीडा प्रतिनिधी)

रोहित शर्मा (कर्णधार), अ‍ॅरॉन फिंच, अंबाती रायुडू, अभिमन्यू मिथून, आदित्य तरे, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, कोरी अँडरसन, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, मर्चेट डी लांगे, पवन सुयाल, श्रेयश गोपाल, लेंडल सिमेन्स, प्रग्यान ओझा, मिचेल मॅकक्लीनागन, एडेन ब्लिजार्ड, अक्षय वखरे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्या, जगदीश सुचित, उन्मुक्त चंद आणि आर. विनयकुमार.

जॉर्ज बेली (कर्णधार), अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंडरिक्स, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, गुरकीरतसिंग मान, करणवीर सिंग, मनन वोरा, मिचेल जॉन्सन, परविंदर आवाना, ऋषी धवन, संदीप शर्मा, शार्दुल ठाकुर, शिवम शर्मा, शॉन मार्श, थिसारा परेरा, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक आणि योगेश गोवलकर.

२०१२ मध्ये पंजाबने यजमानांना घरच्या मैदानावर धक्का दिला होता. मात्र यानंतरच्या सलग दोन वर्षी मुंबईकरांनी पंजाबला लोळवले होते. सलामीच्या सामन्यात संघ अडचणीत असताना कर्णधार रोहित शर्माने नाबाद ९८ धावा कुटताना मुंबईला आव्हानात्मक मजल मारून दिली होती.

मूळचा मुंबईकर असलेला शार्दुल वानखेडेची खेळपट्टी चांगली ओळखून असल्याने पंजाबला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. त्याचबरोबर या खेळपट्टीवर कसा मारा करावा, याबाबतच्या काही टीप्सदेखील संघासाठी मोलाच्या ठरतील. त्यामुळेच आजच्या सामन्यात शार्दुल खेळणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पहिल्या सामन्यात विश्रांती दिलेल्या शार्दुल ठाकूरला या सामन्यात खेळवण्याचा निर्णय पंजाब घेऊ शकतो.

Web Title: Mumbai's dancer playing at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.