मुंबईच्या मुलींचे ‘सुवर्ण’
By admin | Published: October 31, 2016 04:19 AM2016-10-31T04:19:56+5:302016-10-31T04:19:56+5:30
महाराष्ट्र राज्यस्तरीय टग आॅफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धेत १३ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत अनुक्रमे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर संघाने विजेतेपद मिळवले.
मुंबई : महाराष्ट्र राज्यस्तरीय टग आॅफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धेत १३ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत अनुक्रमे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर संघाने विजेतेपद मिळवले. ‘जोर लगाके...’असे संपूर्ण स्पर्धेत मुंबईच्या मुलींचे वर्चस्व दिसून आले. स्पर्धेत राज्यातून ३५ संघांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र टग आॅफ वॉर संघटना आणि मुंबई टग आॅफ वॉर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चेंबूर येथील गांधी मैदानात रंगलेल्या स्पर्धेत मुंबई उपनगरसह मुंबई शहर, पुणे,अहमदनगर, कोल्हपूर अशा सर्व मुलींच्या जिल्हा संघाने हजेरी लावली. स्पर्धेपूर्वी सर्व संघाच्या खेळाडंूनी दिमाखात पदसंचलन केले. स्पर्धेत १३ वर्षांखालील वयोगटासाठी ३४० किलोग्रॅम, १५ वर्षांखालील गटासाठी ३६० किलो, १७ वर्षांखालील गटासाठी ४०० व ४२० किलो आणि १९ वर्षांखालील गटासाठी ४४० व ४६० किलो अशी वजनमर्यादा निश्चित करण्यात आली होती.
स्पर्धेच्या ३४० किलो आणि ४६० किलो वजनी गटात अनुक्रमे मुंबई उपनगर आणि मुंबई संघाने नागपूर संघाला धुळ चारत सुवर्ण पदाकाला गवसणी घातली. तर दोन्ही गटात नागपूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ४४० किलो वजनी गटात मुंबईकरांनी पुणे करांना नमवत सुवर्ण कमाई केली. ३४० किलो गटात सोलापूर संघाने कांस्यपदकावर नाव कोरले. तर पुणे संघाने ४६० किलो वजनी गटात कांस्यपदकावर झेप घेतली. स्पर्धेच्या ३६० किलो वजनी गटात मुंबई उपनगरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर सोलापूर संघाने अव्वल स्थान पटकावले असून दुसऱ्या स्थानी लातूर संघाने झेप घेतली. तर ४०० किलो वजनी गटात मुंबईकरांनी रौप्य पदक पटकावले असून या गटात नागपूरकरांनी बाजी मारली. ४२० किलो वजनी गटात सोलापूर संघाने विजेतेपद मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)