मुंबईची पकड घट्ट !
By admin | Published: January 31, 2015 04:55 AM2015-01-31T04:55:11+5:302015-01-31T04:55:11+5:30
यंदाच्या रणजी मोसमात तब्बल ६ सामन्यांनंतर अखेर बडोदाविरुद्ध मुंबईचा बहारदार खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावात यजमान
बडोदा : यंदाच्या रणजी मोसमात तब्बल ६ सामन्यांनंतर अखेर बडोदाविरुद्ध मुंबईचा बहारदार खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावात यजमान बडोदाने २८७ धावांमध्ये रोखल्यानंतर मुंबईने बलविंदर संधू (४/३५) आणि हरमीत सिंग (४/५२) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर यजमानांना १८४ धावांत गुंडाळून तब्बल १०३ धावांची मजबूत आघाडी घेतली. याआधी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे (२६६ चेंडूंत १२७ धावा) याने फटकावलेल्या संयमी नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला.
मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर केदार देवधर (२३) आणि कर्णधार आदित्य वाघमोडे (०) लागोपाठ बाद झाल्याने बडोदाची अवस्था बिनबाद ४७वरून २ बाद ४७ अशी झाली.
यानंतर फलकावर ५२ धावा लागलेल्या असताना सौरभ वाकसकर (२२)देखील माघारी परतल्याने यजमान अडचणीत आले. विशेष म्हणजे हे तिन्ही फलंदाज संधूने बाद केल्याने त्याने आपली निवड सार्थ ठरवली. यानंतर मुंबईचा हुकमी एक्का
शार्दुल ठाकूरने युसुफ पठाणला माघारी धाडत बडोदाची ४ बाद ६१ अशी कोंडी केली.
या वेळी मुंबई पकड घट्ट करणार असे दिसत असतानाच हार्दिक पंड्या (५३) आणि दीपक हुडा (३१) यांनी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र पुन्हा एकदा संधूने मुंबईला यश मिळवून देताना हुडाचा अडसर दूर केला. तर यजमानांचे शेपूट फार वेळ तग धरणार नाही याची योग्य खबरदारी घेताना हरमीत सिंगने इरफान पठाण (११), पिनल शहा (०), स्वप्निल सिंग (१६) आणि भार्गव भट्ट (६) यांना तंबूचा रस्ता दाखवत मुंबईला निर्णायक आघाडी मिळवून दिली. यजमानांकडून हार्दिक पंड्याने एकाकी लढत देताना सर्वाधिक ५३ धावा काढल्या.
तत्पूर्वी कालच्या ६ बाद २१८ या धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईला सुरुवातीलाच धक्का बसला. शार्दुल ठाकूरला भोपळा फोडण्यात अपयश आल्याने याच धावसंख्येवर मुंबईची सातवी विकेट पडली. त्याचवेळी एका बाजूने फलंदाज केवळ हजेरी लावून जात असताना कर्णधार तरे मात्र तळ ठोकून उभा होता. तरेने मोक्याच्या वेळी फटकेबाजी करताना मुंबईची धावसंख्या २८७ धावांवर नेली.
तरेने १४ चौकार व १ उत्तुंग षटकार खेचताना शतक झळकावले. तर यजमानांकडून पठाण बंधूंनी प्रत्येकी ३ तर मुनाफ पटेलने २ गडी बाद करताना मुंबईची धावसंख्या मर्यादित राखली. (क्रीडा प्रतिनिधी)