मुंबईचा ‘हिट’ शो
By admin | Published: May 2, 2017 01:35 AM2017-05-02T01:35:05+5:302017-05-02T01:35:05+5:30
तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा
मुंबई : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा ५ विकेट्सने पराभव केला. या ‘रॉयल’ विजयाच्या जोरावर पुन्हा एकदा मुंबईकरांनी गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेताना १६ गुणांची कमाई केली. त्याचवेळी, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या आरसीबीला आणखी एका पराभवास सामोरे जावे लागले. नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह मुंबईने प्ले आॅफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक सुरुवात केल्यानंतर मुंबईकरांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा डाव निर्धारीत षटकात ८ बाद १६२ धावांवर रोखला गेला. मुंबईकरांनी या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना एक चेंडू राखून ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १६५ धावा केल्या.
कर्णधार रोहित शर्माने शानदार कॅप्टन इनिंग खेळताना नाबाद ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने ३७ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व एका षटकाराने आपली खेळी सजवली. धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर फॉर्ममध्ये असलेला पार्थिव पटेल बाद झाल्याने मुंबईकरांना सुरुवातीलाच झटका बसला. परंतु, जोस बटलर (२१ चेंडूत ३३) आणि नितिश राणा (२८ चेंडूत २७) यांनी ६१ धावांची वेगवान भागीदारी करुन मुंबईला सावरले. हे दोघे संघाला सहज विजय मिळवून देणार असे दिसत असतानाच, मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली.
पवन नेगीने बटलर आणि राणा या दोघांनाही झटपट बाद करुन आरसीबीला पुनरागमन करुन दिले. रोहित शर्मा - केरॉन पोलार्ड जोडी जमली असे दिसत असतानाच युझवेंद्र चहलने पोलार्डला बाद केले. पाठोपाठ कृणाल पांड्या जखमी झाल्याने निवृत्त झाला, तर कर्ण शर्मालाही फारशी चमक दाखवता आली नाही. यावेळी, अचूक माऱ्याच्या जोरावर पुनरागमन केलेला आरसीबी संघ पराभवाची मालिका संपुष्टात आणणार असेच चित्र होते.
परंतु, ‘हिटमॅन’ रोहितने आरसीबीचे स्वप्न धुळीस मिळवताना अखेरपर्यंत संयमाने फटकेबाजी करुन मुंबईचे विजयी सत्र कायम राखले. हार्दिक पांड्याने (नाबाद १४) रोहितला चांगली साथ देत मुंबईच्या विजयात योगदान दिले. आरसीबीकडून नेगीने २ बळी घेतले. तसेच, अंकित चौधरी, चहल आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, आघाडीची फळी ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर एबी डिव्हिलियर्सच्या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली. डिव्हिलियर्सने २७ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावांचा तडाखा दिला. कर्णधार कोहली (२०), मनदीप सिंग (१७), ट्राविस हेड (१२), केदार जाधव (२८) व शेन वॉटसन (३) पुन्हा अपयशी ठरले. नेगीने (३५) अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीला दिडशेचा पल्ला पार करता आला. मिशेल मॅक्क्लेनघनने ३, तर कृणाल पांड्याने २ बळी घेत आरसीबीच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक :
रॉयल चँलेंजर्स बँगलोर : कोहली झे. रोहित गो. मॅक्क्लेनघन २०, मनदीप झे. हार्दिक गो कर्ण १७, हेड झे. हार्दिक गो. कृणाल १२, एबी झे. बुमराह गो. कृणाल ४३, केदार झे. पोलार्ड गो. मॅक्क्लेनघन २८, वॉटसन त्रि. गो. बुमराह ३, नेगी झे. पोलार्ड गो. मॅक्क्लेनघन ३५, मिल्ने नाबाद ०, अरविंद धावबाद (पटेल) ०. अवांतर - ४. एकूण २० षटकात ८ बाद १६२ धावा. गोलंदाजी : मॅक्क्लेनघन ३/३४, मलिंगा ०/३१, हार्दिक ०/५, कर्ण १/२३, बुमराह १/३३, कृणाल २/३४.
मुंबई इंडियन्स : पटेल झे. चहल गो. चौधरी ०, बटलर झे. हेड गो. नेगी ३३, राणा झे. हेड गो. नेगी २७, रोहित ५६*, पोलार्ड झे. हेड गो. चहल १७, कृणाल निवृत्त २, कर्ण झे. मिल्ने गो. वॉटसन ९, हार्दिक १४*. अवांतर - ७. एकूण : १९.५ षटकात ५ बाद १६५ धावा. गोलंदाजी : पवन नेगी २/१७, वॉटसन १/२८, चौधरी १/३२, चहल १/३६.