प्रो कबड्डीत मुंबईचा 'जय हो', मुंबईकरांनी काढली यूपी योद्धांची हवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:49 AM2018-11-14T06:49:15+5:302018-11-14T06:51:22+5:30
प्रो कबड्डी ; पिछाडीवरुन पुनरागमन करत यू मुंबाने मारली ४१-२४ अशी बाजी
मुंबई : सुरुवातीला संथ खेळ केलेल्या यू मुंबाने दुसऱ्या सत्रात जबरदस्त आक्रमक खेळ करत प्रो कबड्डी लीगच्या इंटरझोन लढतीत यूपी
योद्धा संघाचा ४१-२४ असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह मुंबईकरांनी ‘अ’ गटात ४६ गुणांची कमाई करत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. अन्य लढतीत पुणेरी पलटनला तेलगू टायटन्सविरुद्ध २५-२८ असा निसटता पराभव पत्करावा लागला.
वरळी येथील एनएससीआय डोम स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने संथ सुरुवात केली. यूपी योद्धाने यावेळी काहीसा वेगवान खेळ करत सामन्यावर वर्चस्व मिळवण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु, मुंबईकरांनी मध्यंतराला १५-१४ अशी नाममात्र आघाडी घेतली.
दुसºया सत्रात मात्र यू मुंबाने यूपी योद्धा संघाला आपला हिसका दाखवला. पिछाडीवरुन पुनरागमन करण्यात माहीर असलेल्या मुंबईकरांनी जबरदस्त आक्रमण करत योद्धांच्या खेळातील हवाच काढली. सिद्धार्थ देसाई, सुरेंदर सिंग आणि दर्शन कडियन यांनी प्रत्येकी ७ गुण मिळवले. हुकमी संरक्षक फझल अत्राचली याने ६ गुण मिळवत योद्धाचे आक्रमण खिळखिळे केले. यूपी योद्धांकडून नरेंदर आणि सचिन यांनी प्रत्येकी ५ गुण घेत अपयशी झुंज दिली. यूपीचा स्टार आणि मुळचा मुंबईकर रिशांक देवाडिगाही यावेळी अपयशी ठरला.
तत्पूर्वी अन्य सामन्यात तेलगू टायटन्सने दबावाच्या क्षणी शांत खेळ करताना पुणेरी पलटणचा २८-२५ असा पराभव केला.
पुणेकरांनी जबरदस्त पुनरागमन करताना अखेरच्या काही मिनिटांत १० गुणांची पिछाडी २ गुणांपर्यंत आणली, पण अखेर तेलगूकडील आघाडी निर्णायक ठरली.