देवेंद्रसमोर मुंबईचे ‘नमन’!
By admin | Published: January 8, 2015 01:20 AM2015-01-08T01:20:52+5:302015-01-08T01:20:52+5:30
रणजी करंडक स्पर्धेच्या पाचव्या लढतीत ४०४ धावांचा डोंगर उभा करूनही यजमान मुंबईला मध्य प्रदेशसमोर ‘नमन’ व्हावे लागले.
रणजी करंडक : मध्ये प्रदेशची १३४ धावांची आघाडी
मुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या पाचव्या लढतीत ४०४ धावांचा डोंगर उभा करूनही यजमान मुंबईला मध्य प्रदेशसमोर ‘नमन’ व्हावे लागले. कर्णधार देवेंद्र बुंदेला आणि यष्टीरक्षक नमन ओझा यांच्या प्रत्येकी शतकी खेळीच्या बळावर मध्य प्रदेशने तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ५३८ धावांची मजल मारली. या दोघांच्या शतकांमुळे पाहुण्यांनी १३४ धावांची आघाडी घेतली आहे.
३ बाद २२१ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मध्य प्रदेशसाठी बुंदेला आणि ओझा धावून आले. दुसऱ्या दिवसअखेर बुंदेला ४२ तर ओझा ६० धावांवर खेळत होते. या धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २५८ धावांची विक्रमी भागीदारी केली. आगामी तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघात राखीव यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या ओझाने १९ चौकार आणि एक षटकार खेचून १५५ धावा, तर बुंदेलाने १४ चौकार व १ षटकार खेचून ११५ धावा चोपल्या. मुंबईच्या आक्रमणासमोर या जोडीने तब्बल ४७८ चेंडूंचा सामना करून २५८ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीमुळे मध्य प्रदेशने मुंबईने पहिल्या डावात केलेल्या ४०४ धावांचा पल्ला सहज पार केला. ओझाने आपले १८ वे प्रथम श्रेणीतील शतक पूर्ण केले.
७९ षटकांची ही भागीदारी जावेद खान याने ओझाला बाद करून तोडली. त्यापाठोपाठ बुंदेलाही संघाचा चारशेचा आकडा पार करून माघारी परतला. त्याला इकबाल अब्दुल्लाने बाद केले. ही जोडी माघारी परतल्यानंतर मध्य प्रदेशवर दडपण निर्माण होईल असे वाटले होते, परंतु हरप्रीत सिंग भाटीयाच्या वादळी खेळीने मुंबईला हतबल केले. हरप्रीतने ८७ चेंडूत १० चौकार व १ षटकार खेचून ६७ धावांची ताबडतोड खेळी केली. तिसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने १६२ षटकांत ७ बाद ५३८ धावांची मजल मारली होती. अंकित शर्मा (३५) आणि पुनीत दाते (१६) हे खेळत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
गेल्या दोन सामन्यांत प्रत्येकी पाच विकेट्स घेणाऱ्या शार्दूल ठाकूरची लय वानखेडे स्टेडियमवर हरवली आहे. आतापर्यंत यंदाच्या हंगामात मुंबईकडून सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या शार्दूलला ३२ षटकांत एकही विकेट घेता आलेली नाही. त्यात त्याने केवळ ७ निर्धाव षटके टाकली आणि ३.५६च्या सरासरीने ११४ धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : सर्वबाद ४०४ धावा
मध्य प्रदेश : संजय मिश्रा धावबाद (जावेद) १०, जलाज सक्सेना झे. खान व अब्दुल्ला ८५, रमीज खान झे. तरे गो. मोटा १८, नमन ओझा झे. यादव गो. जावेद १५५, देवेंद्र बुंदेला झे. मोटा गो. अब्दुल्ला ११५, हरप्रीत सिंग झे. मोटा गो. लाड ६७, शुभम शर्मा झे. यादव गो. अब्दुल्ला १५, अंकित शर्मा नाबाद ३५, पुनीत दाते नाबाद १६. अवांतर - २२ ; एकूण - १६२ षटकांत ७ बाद ५३८ धावा
गोलंदाजी - शार्दूल ठाकूर ३२-७-११४-०, विल्कीन मोटा २९-७-८८-१, जावेद खान २९-८-७८-१, क्षेमल वायंगणकर १८-२-४६-०, इकबाल अब्दुल्ला ४०-६-१२३-३, अखिल हेरवाडकर ६-०-२७-०, सूर्यकुमार यादव ३-०-२२-०, सिद्धेश लाड ५-०-२४-१.
258 धावांची भागीदारी बुंदेला आणि ओझा यांनी चौथ्या विकेटसाठी करून मध्य प्रदेशला आघाडी मिळवून दिली. या जोडीने ७९.१ षटके खेळपट्टीवर तग धरत ३.२५च्या सरासरीने धावा केल्या.
155 धावांची खेळी करणाऱ्या नमन ओझाने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १८ वे शतक मुंबईविरुद्ध ठोकले. या खेळीत त्याने ३५८ मिनिटे खेळपट्टीवर तग धरून २६९ चेंडूंत १४ चौकार व १ षटकार खेचत मुंबईच्या गोलंदाजांची हवा काढली.