मुंबईचा पो‘लॉर्ड’ विजय
By admin | Published: April 21, 2016 04:23 AM2016-04-21T04:23:06+5:302016-04-21T04:23:06+5:30
मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवताना बलाढ्य रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेटनी लोळवले. मुंबईने एकूण ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली.
रोहित नाईक, मुंबई
कर्णधार रोहित शर्माच्या चमकदार अर्धशतकानंतर जोस बटलर आणि विध्वंसक किरॉन पोलार्ड यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवताना बलाढ्य रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेटनी लोळवले. मुंबईने एकूण ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या शानदार सामन्यात बँगलोरने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने १८ षटकांतच ४ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. रोहितने ४४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावा फटकावल्या. अंबाती रायुडूनेही ३१ धावांची खेळी केली. रोहित-रायुडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला. इक्बाल अब्दुल्लाने रायुडूला बाद करून ही जोडी फोडली.
मात्र, यानंतर बटलर आणि पोलार्ड यांनी चौफेर फटकेबाजी करताना बँगलोरच्या आव्हानातली हवा काढली. बटलरने १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. तर, पोलार्डने केवळ १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ३९ धावांचा विजयी तडाखा दिला.
अब्दुल्लाने (३/४०) मुंबईला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहली व धडाकेबाज एबी डिव्हिलीयर्स यांच्या जोरावर बँगलोरने आक्रमक सुरुवात केली.
मात्र, कृणाल पंड्याने एकाच षटकात या दोघांना बाद करून बँगलोरला कोंडीत पकडले. मात्र, अखेरच्या क्षणी ट्राविस हेड व सर्फराझ खान यांनी केलेल्या वेगवान ६३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर जोरावर बँगलोरने मुंबईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान उभे केले. हेडने २४ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या, तर सर्फराझने १८ चेंडूंत २८ धावांचा तडाखा दिला. मुंबईकडून बुमराह (३/३१) व कृणाल (२/२७) यांनी चांगला मारा केला.
> धावफलक :
रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली झे. साउदी गो. कृणाल पंड्या ३३, लोकेश राहुल झे. हरभजनसिंग गो. मॅक्लेनघन २३, एबी डिव्हिलीयर्स यष्टीचीत (पटेल) गो. हार्दिक पंड्या २९, शेन वॉटसन झे. पटेल गो. बुमराह ५, ट्रॅव्हिस हेड धावबाद (हरभजन/पटेल) ३७, सर्फराझ खान झे. कृणाल पंड्या गो. बुमराह २८, स्टुअर्ट बिन्नी घे. हार्दिक पंड्या गो. बुमराह १, हर्षल पटेल नाबाद ०, केन रिचर्डसन नाबाद १; अवांतर : १३; एकूण : २० षटकांत ७ बाद १७०; गडी बाद होण्याचा क्रम : १/३२, २/९१, ३/९३, ४/९९, ५/१६२, ६/१६९, ७/१६९; गोलंदाजी : टीम साउदी ४-०-२५-०, मिशेल मॅक्लेनघन ४-०-४६-१, जसप्रीत बुमराह ४-०-३१-३, हरभजनसिंग २-०-२०-०, कृणाल पंड्या ४-०-२७-२, हार्दिक पंड्या २-०-१८-०.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. डिव्हिलीयर्स गो. इक्बाल अब्दुल्ला ६२, पार्थिव पटेल झे. डिव्हिलीयर्स ५, अंबाती रायुडू झे. रिचर्डसन ूगो. इक्बाल अब्दुल्ला ३१, जोस बटलर झे. वॉटसन गो. इक्बाल अब्दुल्ला २८, किरॉन पोलार्ड नाबाद ३९, हार्दिक पंड्या नाबाद २; अवांतर : ०३; एकूण : १८ षटकात ४ बाद १७१; गडी बाद होण्याचा क्रम : १/६, २/८२, ३/१०९, ४/१४०; गोलंदाजी : वरुण अॅरॉन ४-०-३७-०, केन रिचर्डसन ३-०-२६-१, शेन वॉटसन ४-०-४०-०, हर्षल पटेल २-०-२०-०, इक्बाल अब्दुल्ला ४-०-४०-३, स्टुअर्ट बिन्नी १-०-८-०.