मुंबईचा दुसरा पराभव

By Admin | Published: January 8, 2016 03:13 AM2016-01-08T03:13:44+5:302016-01-08T03:13:44+5:30

श्रेयश अय्यरने झळकावलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतरही मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला

Mumbai's second defeat | मुंबईचा दुसरा पराभव

मुंबईचा दुसरा पराभव

googlenewsNext

कटक : श्रेयश अय्यरने झळकावलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतरही मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशने मधल्या फळीतील उमंग शर्माच्या (नाबाद ४७) निर्णायक खेळीच्या जोरावर मुंबईने दिलेल्या १६५ धावांचे लक्ष्य २ चेंडू राखून पार केले.
बाराबती स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने मुंबईला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. अखिल हेरवाडकर आणि श्रेयश यांनी मुंबईला शानदार ६७ धावांची सलामी दिली. हेरवाडकरला (२८) बाद करून पीयूष चावलाने ही जोडी फोडली. यानंतर श्रेयशने कर्णधार आदित्य तरेसह ५८ धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मुंबईच्या धावफलकावर ११२ धावा लागलेल्या असताना श्रेयश अंकित राजपूतचा शिकार ठरला. श्रेयशने ४३ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह ७८ धावा कुटल्या. यानंतर मात्र मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली. ठरावीक अंतराने धक्के देत उत्तर प्रदेशने मुंबईला निर्धारित २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर रोखले. अंकित राजपूत आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी २ बळी घेताना मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक दिला.
अखेरच्या क्षणी उत्तर प्रदेशने टिच्चून मारा करताना मुंबईकरांना जखडवून ठेवण्यात यश मिळवले. प्रशांत गुप्ता (३३) आणि समर्थ सिंग (१६) यांनी उत्तर प्रदेशला ४० धावांची सलामी दिली. यानंतर कर्णधार सुरेश रैना (२०) आणि अक्षदीप सिंग (१४) यांनीही योगदान दिले. मात्र उमंग शर्माने मुंबईकरांचा खरपूस समाचार घेताना ३२ धावांत ४ चौकार व २ षटकारांसह निर्णायक नाबाद ४७ धावांची खेळी करून उत्तर प्रदेशला विजयी केले. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर प्रवीण तांबे व अभिषेक नायर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.
यासह सलग चौथा विजय मिळवताना उत्तर प्रदेशने ‘ड’ गटात सर्वाधिक १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून स्पर्धेच्या सुपर लीग फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. त्याचवेळी मुंबईचा चार सामन्यांतून हा दुसरा पराभव आहे. ८ गुणांसह मुंबईकर तिसऱ्या स्थानी आहेत.
मुंबई : २० षटकांत ६ बाद १६४ धावा (श्रेयश अय्यर ७८, अखिल हेरवाडकर २८, अभिषेक नायर नाबाद २२; अंकित राजपूत २/२७, पीयूष चावला २/२१)
उत्तर प्रदेश : १९.४ षटकांत ६ बाद १६८ धावा. (उमंग शर्मा नाबाद ४७, प्रशांत गुप्ता ३३; धवल कुलकर्णी २/३१, सिद्धेश लाड २/२७)

Web Title: Mumbai's second defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.