मुंबईचा 'श्रीगणेशा'
By admin | Published: April 20, 2015 01:33 AM2015-04-20T01:33:58+5:302015-04-20T15:13:15+5:30
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी झाल्याने मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला वहिला विजय मिळाला.
बंगलोर - फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी झाल्याने मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला वहिला विजय मिळाला. बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात मुंबईने रॉयल चॅलेंर्जस बंगलोर संघाला १८ धावांनी हरविले. २७ धावांत तीन बळी घेणारा हरभजन सामनावीर ठरला.
पराभवाचा ‘चौकार’ सहन करणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध फलंदाजीत ‘दम’ दाखवला. लेंडल सिमन्स (५९) आणि उन्मुक्त चंद (५८) यांच्या तडफदार अर्धशतकांच्या बळावर मुंबईने बंगळुरुपुढे ‘द्विशतकी’ आव्हान उभे केले. त्यांनी २० षटकांत ७ बाद २०९ धावा केल्या. गेल्या चार सामन्यांतील मुंबईची ही सर्वांत मोठी धावसंख्या ठरली. दुसरीकडे, नव्याने संधी देण्यात आलेल्या बंगळुरुच्या डेव्हिड विजे या गोलंदाजाने छाप सोडली. त्याने ४ बळी घेतले. मुंबई संघात दोन बदल करण्यात आले. कोरी अँडरसनच्या जागी उन्मुक्त चंदला, तर विनयकुमार याच्या जागी मॅकक्लीनगला संधी देण्यात आली. यामध्ये उन्मुक्तने संधीचे सोने केले. त्याने ३७ चेंडंूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावा चोपल्या. त्या मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघात डॅरेन सॅमी, सीन अॅबोट, मनदीप सिंह यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी इक्बाल अब्दुल्ला, डेव्हिड विजे, रिली रोसो आणि मनविंदर बिस्ला यांना संधी मिळाली. मुंबईने शानदार सुरुवात केली. सिमन्स आणि पार्थिव पटेलने डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. पार्थिव १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिमन्स आणि चंदने संघाला शतकापर्यंत नेले. यामध्ये सिमन्सने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकार ठोकत ५९ धावा केल्या.
चाहलाच्या चेंडूवर अॅरोनकरवी तो झेलबाद झाला. एका बाजूने शानदार फटकेबाजी करणाऱ्या उन्मुक्तने रोहित शर्मासोबत ६३ धावांची भागीदारी केली. रोहितने अवघ्या १५ चेंडूंत ४२ धावा चोपल्या. यात त्याच्या ३
चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. पोलार्डने ५ धावांचे योगदान दिले.