महाराष्ट्राविरुद्ध मुंबईचा भक्कम प्रारंभ

By admin | Published: October 18, 2016 04:18 AM2016-10-18T04:18:02+5:302016-10-18T04:18:02+5:30

कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राविरुद्ध भक्कम प्रारंभ करताना मुंबईने सोमवारी, पहिल्या दिवशी ४ बाद २७३ धावा केल्या

Mumbai's strong start against Maharashtra | महाराष्ट्राविरुद्ध मुंबईचा भक्कम प्रारंभ

महाराष्ट्राविरुद्ध मुंबईचा भक्कम प्रारंभ

Next


पुणे : कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राविरुद्ध भक्कम प्रारंभ करताना मुंबईने सोमवारी, पहिल्या दिवशी ४ बाद २७३ धावा केल्या. महाराष्ट्राचा माजी खेळाडू असलेला पुण्याचा शुभम रांजणे याने मुंबईतर्फे झळकावलेले नाबाद अर्धशतक आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर आजपासून ही ४ दिवसीय लढत सुरू झाली. बीसीसीआयतर्फे आयोजित २३ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा १३७ चेंडूंत ३ षटकार आणि १० चौकार लगावणारा शुभम ८७ धावांवर, तर साईराज पाटील १२२ चेंडूंत १ षटकार व १० चौकारांसह ७८ धावांवर खेळ होते. सलामीवीर वैदिक मूरकर यानेही ५२ धावांचे (१२२ चेंडूंत ७ चौकार) योगदान दिले. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढे याने प्रभावी मारा करताना ५८ धावांत ३ बळी घेतले.
आकर्षित गोमेल आणि वैदिक मूरकर यांनी मुंबईला ७४ धावांची सावध सलामी दिली. जगदीश झोपेने आकर्षितला पायचित करून महाराष्ट्राला पहिले यश मिळवून दिले. मुंबईने शतकाची वेस ओलांडल्यानंतर वैदिक प्रदीप दाढेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या वेळी मुंबईच्या २ बाद १०७ धावा झाल्या होत्या. याच धावसंख्येवर मुंबईचा कर्णधार एकनाथ केरकर याला शून्यावर बाद करून दाढेने महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले. त्याने विक्रांत आवटीला बाद करून मुंबईची अवस्था ४ बाद १११ अशी केली.
अवघ्या ४ धावांच्या अंतरात ३ महत्वाचे फलंदाज बाद झाल्याने मुंबईचा संघ दबावाखाली आला होता. अशा कठीण परिस्थिीतीतून शुभम-साईश्राज जोडीने मुंबईला सावरले. (क्रीडा प्रतिनिधी)
>संक्षिप्त धावफलक :
मुंबई : पहिला डाव : ४ बाद २७३ (शुभम रांजणे खेळत आहे ८७, साईराज पाटील खेळत आहे ७८, वैदिक मूरकर ५२, आकर्षित गोमेल ३९, प्रदीप दाढे ३/५८, जगदीश झोपे १/७२).

Web Title: Mumbai's strong start against Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.