मुंबईची दिल्लीवर यशस्वी स्वारी

By admin | Published: February 6, 2016 03:15 AM2016-02-06T03:15:23+5:302016-02-06T03:15:23+5:30

जयपूर पिंक पँथरकडून झालेल्या निराशाजनक पराभवानंतर गतविजेत्या यू मुंबाने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दबंग दिल्लीवर ३०-१७ अशी यशस्वी स्वारी करत प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात विजयी कूच

Mumbai's successful invasion of Delhi | मुंबईची दिल्लीवर यशस्वी स्वारी

मुंबईची दिल्लीवर यशस्वी स्वारी

Next

बंगळुरू : जयपूर पिंक पँथरकडून झालेल्या निराशाजनक पराभवानंतर गतविजेत्या यू मुंबाने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दबंग दिल्लीवर ३०-१७ अशी यशस्वी स्वारी करत प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात विजयी कूच केली. त्याचवेळी दिल्लीकरांनी सलग चौथा सामना गमावताना पराभवाचा चौकार लगावला. यानंतरच्या सामन्यात बंगळुरू बुल्सने अनपेक्षित निकाल नोंदवताना बलाढ्य जयपूर पिंक पँथर्सला ३६-२६ असा धक्का दिला.
श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात यू मुंबाने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने खेळत आपला इरादा स्पष्ट केला. ९व्या मिनिटालाच मुंबईकरांनी दिल्लीवर लोण चढवून १०-२ अशी भक्कम आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. त्यातच १५व्या मिनिटाला दिल्लीचा हुकमी काशिलिंग आडके जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेला. मध्यांतराला यू मुंबाने १६-७ अशी आघाडी घेत वर्चस्व राखले. यानंतर मुंबईने आणखी आक्रमक पवित्रा घेताना दिल्लीकरांना कबड्डीचे धडेच दिले.
कर्णधार अनुप कुमार, रिशांक देवाडिया यांनी आक्रमक चढाया करताना दिल्लीवर प्रचंड दबाव टाकले; तर मोहित चिल्लर व सुरेंद्र नाडा यांनी दमदार पकडी करताना त्यांना चांगली साथ दिली. रिशांकने उत्कृष्ट पकडी करून अष्टपैलू खेळाने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या वेळी मंबईने दिल्लीवर दुसरा लोण चढवून सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. दिल्लीकडून अनिल कुमार व कुलदीप सिंग यांची झुंज अपयशी ठरली.
यानंतर यजमान बंगळुरू बुल्सने सलग दोन पराभवांनंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर येताना बलाढ्य जयपूर पिंक पँथर्सला ३६-२६ असा धक्का दिला. अमित राठी व श्रीकांत तेवठिया यांनी प्रत्येकी एका सुपर टॅकलसह केलेला अष्टपैलू खेळ बंगळुरूच्या विजयात निर्णायक ठरला. जयपूरकडून राजेश नरवालने एकाकी लढत दिली. मध्यांतराला जयपूर एका गुणाने १४-१३ असे आघाडीवर होते. मात्र नंतर यजमानांनी सामना सहज फिरवला.

Web Title: Mumbai's successful invasion of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.