मुंबईचा शानदार विजय
By admin | Published: December 14, 2015 02:46 AM2015-12-14T02:46:24+5:302015-12-14T02:46:24+5:30
फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय मिळवताना
सिकंदराबाद : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय मिळवताना आसामला ९६ धावांनी लोळवले. तीन सामन्यांतून मुंबईचा हा दुसरा विजय असून स्पर्धेच्या ‘अ’ गटात मुंबईकर ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर आसामचा हा सलग तिसरा पराभव असून ते गटात तळाला आहेत.
रेल्वे मैदानावर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून मुंबईकरांनी प्रथम फलंदाजी घेतली खरी, मात्र त्यांचा हा निर्णय चांगलाच महागात पडला. आसामने अनपेक्षित मारा करताना मुंबईकरांचा डाव ४९.५ षटकांत केवळ १९८ धावांत संपुष्टात आणला. रणजी स्पर्धेत मुंबईचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरलेल्या श्रेयश अय्यर सर्वाधिक ४९ धावा फटकावल्या. तर सुर्यकुमार यादवने ४२ धावांचे योगदान दिले. यावेळी आसाम धक्कादायक विजय मिळवणार असे दिसत होते. मात्र मुंबईने लौकिकाप्रमाणे ‘खडूस’ खेळ करताना आसामला विजयापासून दूरच ठेवले.
आंतरराष्ट्रीय गोलंदाज धवल कुलकर्णी याने आपल्या अनुभवाच्या जोरावर आसामला धक्के देताना १० षटकांत केवळ १९ धावा देऊन ४ फलंदाज बाद केले. तर सागर त्रिवेदी आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना धवलला चांगली साथ दिली. या त्रयींच्या भेदकतेपुढे आसामचे फलंदाज कोलमडले आणि त्यांचा डाव ३५ षटकांत केवळ १०२ धावांत संपुष्टात आला. मधल्या फळीतील अमित वर्मा (४८ चेंडूत ३३ धावा) आणि जमालुद्दिन सय्यद मोहम्मद (४८ चेंडूत २५ धावा) यांचा अपवाद वगळता आसामच्या इतर फलंदाजांना फारकाळ तग धरता आला नाही.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव अनपेक्षितपणे रोखण्यात आसामला यश आले. आसामने केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे मुंबईकर अडखळल्याने मुंबईचा अर्धा संघ ९३ धावांत बाद झाला. जय बिस्त स्वस्तात परतल्यानंतर अखिल हेरवाडकरला चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्यात अपयश आले. तो २३ धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार आदित्य तरे (७) देखील अपयशी ठरला. तर पुढच्याच षटकात सिध्देश लाड धावबाद झाल्याने मुंबईची ४ बाद ८४ अशी घसरगुंडी उडाली. एका बाजूने अय्यर भक्कमपणे उभा होता. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले.
अय्यर पाचव्या फलंदाजांच्या रुपात बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. यानंतर सुर्यकुमार यादव तसेच अंतिम फळीतील धवल कुलकर्णी (नाबाद २१) व सागर त्रिवेदी (२४) यांनी उपयुक्त खेळी करताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. आसामच्या प्रितम दास, अमित वर्मा आणि जमालुद्दिन मोहम्मद यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला रोखले.
धावफलक :
मुंबई : अखिल हेरवाडकर धावबाद (अरुण कार्तिक) २३, जय बिस्त झे. रहमान गो. एके दास ७, श्रेयश अय्यर झे. अमित गो. पल्लवकुमार ४९, आदित्य तरे झे. व गो. प्रितम ७, सिद्धेश लाड धावबाद (रॉय) ०, अभिषेक नायर यष्टीचीत रहमान गो. अमित ३, सूर्यकुमार यादव त्रि. गो. सय्यद ४२, इक्बाल अब्दुल्ला झे. रहमान गो. प्रितम १४, धवल कुलकर्णी नाबाद २१, शार्दूल ठाकूर झे. अरुण गो. सय्यद ३, सागर त्रिवेदी झे. अरुण गो. अमित २४. अवांतर - ५. एकूण : ४९.५ षटकांत सर्वबाद १९८ धावा.
गोलंदाजी : क्रिष्णा दास ७-०-२८-०; अरुप दास ९-०-४५-१; प्रितम दास १०-०-४६-२; पल्लवकुमार दास १०-२-३०-१; अमित वर्मा ७.५-०-२३-२; जमालुद्दीन सय्यद मोहम्मद ६-०-२४-२.