चिन्नास्वामीवर मुंबईचं ‘स्वामि’त्व

By admin | Published: May 12, 2016 02:54 AM2016-05-12T02:54:58+5:302016-05-12T02:54:58+5:30

गोलंदाजांनी घेतलेल्या श्रमाचे फलंदाजांनी चीज केल्यामुळे मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेट आणि ८ चेंडू राखून पराभूत केले.

Mumbai's 'Swami' on Chinnaswamy | चिन्नास्वामीवर मुंबईचं ‘स्वामि’त्व

चिन्नास्वामीवर मुंबईचं ‘स्वामि’त्व

Next

विश्वास चरणकर, बंगळुरू
गोलंदाजांनी घेतलेल्या श्रमाचे फलंदाजांनी चीज केल्यामुळे मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेट आणि ८ चेंडू राखून पराभूत केले. आरसीबीने दिलेले १५२ धावांचे आव्हान मुंबईने ४ गड्यांच्या मोबदल्यात १८.४ षटकांत पूर्ण केले. या पराभवामुळे आरसीबीचा प्लेआॅफचा मार्ग खडतर बनला आहे. त्यांना आता पुढील चारीही सामने जिंकावे लागणार आहेत. विजयी मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आली आहे. चार षटकांत १५ धावा देऊन डिव्हीलियर्सचा महत्त्वपूर्ण बळी घेणारा कृणाल पांड्या सामनावीरचा मानकरी ठरला.
चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात बुधवारी आरसीबीने दिलेल्या १५२ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सलामी नेहमीप्रमाणे अपयशी ठरली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अरविंदने पार्थिवला बाद करून मुंबईला झटका दिला. केवळ एक धाव करणारा पार्थिव स्लिपमध्ये शेन वॉटसनकडे झेल देऊन परतला. परंतु या झटक्याचा फारसा परिणाम होऊ न देता रोहित शर्मा आणि अम्बाती रायडू यांनी वाटचाल सुरू ठेवली. दोघांनी सावध खेळी करताना ४१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. ही बहरत चाललेली भागीदारी वरुण अ‍ॅरॉनने संपुष्टात आणली. रोहित त्याचा आवडता पूलचा फटका मारताना चुकला आणि ए. बी. डिव्हीलियर्सच्या हातात सोपा झेल दिला. रोहितने २४ चेंडूंत ३ चौकारांसह २५ धावा केल्या. दहा षटकांनंतर मुंबईच्या २ बाद ६० धावा झाल्या होत्या. योगायोगाने आरसीबीच्याही इतक्याच धावा होत्या.
हार्दिक पांड्याच्या जागी संधी मिळालेल्या नितीश राणा (९) चमक दाखवू शकला नाही, यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर स्टुअर्ट बिन्नीने एका उत्कृष्ट झेलद्वारे त्याला तंबूत धाडले. मुंबईचा धावफलक ३ बाद ७९ असा झाल्यामुळे मुंबईच्या गोटात चिंता पसरली होती. एका बाजूने सेट झालेल्या रायडूला वरुण अ‍ॅरॉनने बाद करून मुंबईचा ठोका वाढविला. रायडूने ४४ धावा केल्या. यानंतर पोलार्ड आणि जोस बटलर या जोडीने कोणतीही पडझड होऊ न देता विजयासाठी आवश्यक धावगती ‘मेंटेन’ केल्याने मुंबईचा विजय साकार झाला. पोलार्ड ३५ धावा (१९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार)आणि बटलर २९ धावांवर (११ चेंडू १ चौैकार, ३ षटकार) नाबाद राहिले. आरसीबीच्या वरुण अ‍ॅरॉनने ३७ धावांत २ बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून रोहित शर्माने यजमान आरसीबीला फलंदाजीस पाचारण केले. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी डावाची सुरुवात केली. मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत विराट (७), गेल (५), ए. बी. डिव्हीलियर्स (२४) आणि शेन वॉटसन (१५) हे दिग्गज फलंदाज अपयशी ठरूनही के. एल राहुलचे झुंजार अर्धशतक आणि त्याने सचिन बेबीसोबत शेवटी केलेल्या २७ चेंडूंत ५३ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने २० षटकांत ४ बाद १५१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. राहुलने ५३ चेंडूंत ६८ धावांची नाबाद खेळी केली. त्याला ऐन मोक्याच्या क्षणी मोलाची साथ देणारा सचिन बेबी २५ धावांवर नाबाद राहिला.
लोकल बॉय के. एल राहुलने ४२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात त्याचे ३ चौकार आणि २ षटकार होते. सामन्यावर मुंबईने पूर्णपणे पकड मिळवली असताना १८ वे षटक किरॉन पोलार्डला देण्याचा रोहित शर्माचा निर्णय महागडा ठरला. या
षटकात तब्बल २२ धावा गेल्या. पोलार्डला राहुलने एक षटकार, तर सचिन बेबीने दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. या षटकामुळे आरसीबीला दीडशेचा टप्पा गाठता आला. राहुल ६८ (५३ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) आणि सचिन बेबी २५ (१३ चेंडू, २ चौकार, २ षटकार) हे
दोघे नाबाद राहिले. मुंबईकडून
कृणाल पांड्याने १५ धावांत १ बळी घेतला.
>संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली ७, ख्रिस गेल ५, ए. बी. डिव्हीलियर्स २४, के. एल. राहुल नाबाद ६८, शेन वॉटसन १५, सचिन बेबी नाबाद २५. अवांतर ७. एकूण २० षटकांत ४ बाद १५१ धावा. गोलंदाजी : साउदी ४-०-२७-१, मॅक्लेनघन ४-०-३५-१, कृणाल पांड्या ४-०-१५-१. मुंबई इंडियन्स : पार्थिव पटेल १, रोहित शर्मा २५, अम्बाती रायडू ४४, नितीश राणा ९, किरॉन पोलार्ड नाबाद ३५, जोस बटलर नाबाद २९. एकूण : १८.४ षटकांत ४ बाद १५३ धावा. अवांतर : १०. गोलंदाजी : एस. अरविंद ४-०-२३-१, चहल ४-०-१६-१, अ‍ॅरॉन ३.४-०-३७-२.

Web Title: Mumbai's 'Swami' on Chinnaswamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.