मुंबईचा थरारक विजय...

By admin | Published: May 15, 2015 03:24 PM2015-05-15T15:24:49+5:302015-05-15T15:28:42+5:30

अखेरच्या षटकांत कोलकाताला विजयासाठी १२ धावांची गरज... कोलकाताच्या सा-या आशा होत्या त्या स्ट्राइकवर असणाऱ्या धडाकेबाज युसूफ पठाणवर.

Mumbai's thrilling victory ... | मुंबईचा थरारक विजय...

मुंबईचा थरारक विजय...

Next

रोहित नाईक, मुंबई
अखेरच्या षटकांत कोलकाताला विजयासाठी १२ धावांची गरज... कोलकाताच्या सा-या आशा होत्या त्या स्ट्राइकवर असणाऱ्या धडाकेबाज युसूफ पठाणवर... त्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू किएरॉन पोलार्डच्या हाती देऊन एकप्रकारे जुगारच खेळला. कारण, संपूर्ण सामन्यात किरॉन पोलार्डने एकही षटक टाकलेले नसताना शेवटचे निर्णायक षटक पोलार्ड टाकणार होता. यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणलेली होती. पोलार्डने देखील आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना या षटकात पठाणच्या विकेटसहीत केवळ ६ धावा देताना मुंबईला थरारकरीत्या ५ धावांनी विजय मिळवून दिला.
अत्यंत चुरशीच्या व तणावपूर्ण झालेल्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या कल्पक नेतृत्त्वाच्या जोरावर मुंबईच्या प्ले आॅफ गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मुंबईने दिलेले १७२ धावांचे आव्हान पार करताना कोलकाताची चांगल्या सुरुवातीनंतरही दमछाक झाली. कोलकाताला २० षटकांत केवळ ७ बाद १६६ धावा अशीच मजल मारता आली. कर्णधार गौतम गंभीर (३८) आणि युसूफ पठाण (५२) यांनी झुंजार फलंदाजी करताना कोलकाताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. जगदीश सुचिथने गंभीरचा अडथळा दूर केल्यानंतर युसूफने आपल्या ‘पठाणी’ दणक्याच्या जोरावर मुंबईच्या तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. अखेरच्या २ षटकांत २१ धावांची गरज असताना हुकूमी लसिथ मलिंगाने केवळ ९ धावा देवून सामना रंगतदार केला. सुचिथचे २ तर हार्दिक पांड्याची ३ षटके बाकी असताना रोहितने चेंडू पोलार्डकडे सोपवून सर्वांनाच चकीत केले. कर्णधाराने खेळलेला हा जुगार पोलार्डने चांगलाच यशस्वी ठरवताना पहिल्याच चेंडूवर धोकादायक पठाणला बाद करून कोलकाताला जखडवून ठेवले.
तत्पूर्वी कोलकाताने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजी दिली. सलामीवर पार्थिव पटेल (२१) आणि लैंडेल सिमेन्स (१४) आणि अंबाती रायडू (२) स्वस्तात परतल्याने मुंबईची ३ बाद ४७ अशी अवस्था झाली. रोहित शर्माने किएरॉन पोलार्डसोबत मुंबईला सावरले. रोहित २१ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावा काढून सुनील नरेनच्या अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत झाला. मुंबई ४ बाद ७९ अशा अडचणीत असताना हार्दिक पांड्याने कोलकाताला चोपण्यास सुरुवात केली. त्याने उमेश यादव टाकत असलेल्या १७व्या षटकात ४ खणखणीत चौकार खेचताना मुंबईच्या धावसंख्येला गती दिली.
पोलार्ड-पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी निर्णायक ५१ चेंडूत ९२ धावांची निर्णायक भागीदारी करुन मुंबईला आव्हानात्मक मजल मारुन दिली. पांड्याने ३१ चेंडूमध्ये ८ चौकार व २ षटकार खेचताना नाबाद ६१ धावांचा तडाखा दिला. तर पोलार्डने ३८ चेंडूत एक चौकार व एक षटकारांसह संयमी ३३ धावांची खेळी खेळली.

धावफलक:
मुंबई इंडियन्स: लैंडल सिमेन्स झे. पांड्ये गो. मॉर्केल १४, पार्थिव पटेल झे. पांड्ये गो. हसन २१, रोहित शर्मा त्रि. गो. नरेन ३०, अंबाती रायडू झे. रसेल गो. हसन २, किरॉन पोलार्ड नाबाद ३३, हार्दिक पांड्या नाबाद ६१. अवांतर - १०. एकूण: २० षटकांत ४ बाद १७१ धावा. गोलंदाजी: उमेश यादव ३-०-३७-०; मॉर्नी मॉर्केल ४-०-२७-१; शाकिब हसन ४-०-२२-२; पीयूष चावला १-०-९-०; सुनील नरेन ४-०-३८-१; आंद्रे रसेल ४-०-३७-०.

कोलकाता नाइट रायडर्स : रॉबिन उथप्पा झे. मलिंगा गो. हरभजन सिंग २५, गौतम गंभीर त्रि. गो. सुचिथ ३८, मनिष पांड्ये धावबाद (सिमेन्स) १, युसूफ पठाण झे. पटेल गो. पोलार्ड ५२, शाकिब अल हसन झे. पांड्या गो. विनयकुमार २३, आंद्रे रसेल झे. पटेल गो. मलिंगा २, सूर्यकुमार यादव झे. रायडू गो. मॅक्क्लेनघन ११, पीयूष चावला नाबाद १, उमेश यादव नाबाद ५. अवांतर - ८. एकूण: २० षटकांत ७ बाद १६६ धावा. गोलंदाजी : लसिथ मलिंगा ४-०-३१-१; मिचेल मॅक्क्लेनघन ४-०-३१-१; विनयकुमार ४-०-३३-१; हरभजन सिंग ४-०-३१-१; जगदीश सुचिथ २-०-२३-१; हार्दिक पाड्या १-०-१०-०; किरॉन पोलार्ड १-०-६-१.

Web Title: Mumbai's thrilling victory ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.